आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बार्शीत रायसी प्रतिक्रमणात १५६ श्रावक-श्राविकांचा सहभाग

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 14, 2026
Spread the love

बार्शी : बार्शीतील श्री वर्धमान जैन स्थानकात रविवार, १३ सप्टेंबर रोजी पर्युषण महापर्वाच्या पावन पर्वात आयोजित करण्यात आलेल्या रायसी प्रतिक्रमणास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. रविवारी पहाटे ५ वाजता सूर्योदयापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या या रायसी प्रतिक्रमणासाठी तब्बल १५६ श्रावक-श्राविकांनी उपस्थिती लावली.

जैन धर्मात देवसी व रायसी असे प्रतिक्रमणाचे दोन प्रकार असून, देवसी प्रतिक्रमण सायंकाळी सूर्यास्तानंतर, तर रायसी प्रतिक्रमण सूर्योदयापूर्वी केले जाते. दिवसाची सुरुवात आत्मपरीक्षण, क्षमायाचना व संयमाच्या साधनेने करण्याच्या भावनेतून रायसी प्रतिक्रमणाला विशेष महत्त्व आहे.

गुरु महाराजांनी संघाला आवाहन करत यंदाच्या पर्युषण महापर्वात रविवारी रायसी प्रतिक्रमणासाठी ‘शंभर प्लस’चा आकडा गाठण्याचे उद्दिष्ट दिले होते. श्री वर्धमान जैन स्थानक, बार्शीच्या १०० वर्षपूर्तीच्या अनुषंगाने दिलेल्या या आवाहनाला संघाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत १००चा आकडा पार करून तब्बल १५६ श्रावक-श्राविकांच्या उपस्थितीने संकल्प पूर्ण केला.

लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत, युवक-युवती तसेच श्रावक-श्राविका अशा सर्वांनी मोठ्या उत्साहाने रायसी प्रतिक्रमणात सहभाग घेत प्रतिक्रमण पूर्ण केले. त्यामुळे श्री वर्धमान जैन स्थानकात भक्तिमय व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

प. पू. डॉ. श्री अचलऋषीजी म. सा. यांनी यावेळी सांगितले की, यावर्षीच्या आठ दिवसीय पर्युषण महापर्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात सुरू असलेल्या या चातुर्मासातील रायसी प्रतिक्रमणाचा हा नवा विक्रम आहे. १५६ श्रावक-श्राविकांची उपस्थिती ही निश्चितच कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री संघाचा आशिर्वादाने श्रावक कमलेश तातेड व अतुल गुगळे यांनी स्वतःच्या मुखातून उपस्थित श्रावकांसमोर रायसी प्रतिक्रमण ऐकवले. तसेच श्राविकांमध्ये मोसमी यश कांकरिया यांनी प्रथमच स्वतःच्या मुखातून उपस्थित श्राविकांसमोर रायसी प्रतिक्रमण ऐकवले. त्यांच्या या धार्मिक सहभागाचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.

संघाचे अध्यक्ष जयचंद सुराणा यांनी संघाला मंगळीक दिली, तर प. पू. डॉ. श्री अचलऋषीजी म. सा. यांनी संघाला पचक्खाण दिले. प्रतिक्रमणानंतर सर्व श्रावक-श्राविकांना आशीर्वाद, मंगलिक व शुभेच्छा देण्यासाठी प. पू. डॉ. अचलऋषीजी म. सा., प. पू. डॉ. प्रणवदर्शनजी म. सा., प. पू. ईशदर्शनजी म. सा., प. पू. परमदर्शनजी म. सा. आणि प. पू. राजुलदर्शनजी म. सा. उपस्थित होते. त्यांनी संघाला मंगळीक देत आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.

या पावन प्रसंगी एकूण १०१ आकर्षक गिफ्ट्सचा लकी ड्रॉ आयोजित करण्यात येणार असून, रायसी प्रतिक्रमणासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व १५६ श्रावक-श्राविकांनाही बक्षीस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे लाभार्थी दानशूर प्रवीणभाई कणकराजजी पुनमिया असून, ‘जिथे कमी तिथे आम्ही मित्र मंडळ, बार्शी’ यांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला आहे.

या कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते सर्वात लहान तपस्वी चि. रोहन किरण श्रीश्रीमाळ यांची उपस्थिती. जैन समाजातील सातवा उपवास सुरू असतानाही त्यांनी रायसी प्रतिक्रमणासाठी उपस्थिती लावून सहभाग घेतला. तसेच उपस्थित सर्व तपस्वी त्यांचा हा सहभाग पुढील येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक व आकर्षणाचा विषय ठरला.

पर्युषण महापर्वाच्या पावन काळात आत्मशुद्धी, क्षमायाचना आणि संयमाच्या साधनेसाठी १५६ श्रावक-श्राविकांनी एकत्र येत रायसी प्रतिक्रमण पूर्ण केले. गुरु महाराजांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शंभरपेक्षा अधिक उपस्थितीचे उद्दिष्ट ओलांडून संघाने धार्मिक एकजुटीचे दर्शन घडविले. त्यामुळे बार्शीतील श्री वर्धमान जैन स्थानकात पार पडलेला हा रायसी प्रतिक्रमणाचा उपक्रम विशेष आणि ऐतिहासिक ठरला.