खून, मोक्काच्या गुन्ह्यातील गुन्हेगार बेळगावातून जेरबंद
गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाची कामगिरी : तीन वर्षे होता फरार, गांजा सेवनाची सवय नडली
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : खून, मोक्काच्या गुन्ह्यात गेली तीन वर्षे फरार असलेल्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने वेशांतर करून बेळगावातून जेरबंद केले. गुन्हेगाराला गांजा पिण्याची असलेल्या सवयीवरून मागोवा घेऊन त्याला अटक करण्यात आली.
मोईनुद्दीन जाफर शेख उर्फ मोईन कालू शेख (वय २८, रा. अड्डगोडी, साऊथ बंगलोर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
येरवडा परिसरात झालेल्या खुनामध्ये मोईन शेख याच्यासह साथीदारांवर २०२३ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून मोईन शेख फरार होता.
विविध गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले होते. गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगुले, सहायक पोलीस फौजदार प्रवीण राजपूत, पोलीस हवालदार अमजद शेख, तुषार खराडे, पोलीस अंमलदार अनिकेत भोसले यांनी समांतर तपास सुरू केला.
मोईन शेख याला गांजा सेवनाची सवय असून तो सध्या कर्नाटकमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी कर्नाटक पोलिसांकडील एनडीपीएस गुन्ह्याची माहिती घेतली. त्यामध्ये २०२४ मध्ये त्याच्यावर एनडीपीएसखाली गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली. त्यावरून संबंधित पोलीस ठाणे आणि कारागृह प्रशासनाकडून माहिती घेण्यात आली.
आरोपी सतत मोबाइल नंबर बदलत असल्याचे दिसून आले. तरीही टेक्निशियन पोलीस अंमलदार अनिकेत भोसले यांनी प्रत्येक वेळी तांत्रिक विश्लेषण करून माहिती दिली. तो थानागुंडी तसेच बंगलोर परिसरात असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांचे पथक ११ सप्टेंबर रोजी बंगलोरला रवाना झाले. अमजद शेख हे चहा विक्रेते झाले, तर प्रवीण राजपूत हे मेकॅनिक होऊन पाळत ठेवत होते. मोईन शेखला संशय आल्याने त्याने पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. तो सार्वजनिक वाहनातून प्रवास करत असल्याने पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यानंतर बेळगाव येथील चिल्ड्रेन गार्डनमध्ये स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करून येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगुले, सहायक पोलीस फौजदार प्रवीण राजपूत, एकनाथ जोशी, पोलीस हवालदार अमजद शेख, तुषार खराडे, अनिकेत भोसले, जहांगीर पठाण, विठ्ठल वाव्हळ यांनी केली आहे.
