ऑनलाइन हिंदी सामान्यज्ञान स्पर्धेने हिंदी पखवाड्याचा शुभारंभ
शंकरराव पाटील महाविद्यालयात विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : विद्या विकास मंडळ, पाथरूड संचलित शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे हिंदी विभाग आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या संयुक्त विद्यमाने हिंदी दिवसानिमित्त हिंदी पखवाड्याला सुरुवात करण्यात आली. प्राचार्य डॉ. अनुराधा जगदाळे यांच्या हस्ते १५ सप्टेंबर रोजी ऑनलाइन हिंदी सामान्यज्ञान स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेविषयी आवड, अभिरुची आणि जागरूकता निर्माण करण्याबरोबरच हिंदीच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समता आणि सांस्कृतिक ऐक्याची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने पखवाड्यात विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाइन हिंदी सामान्यज्ञान स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हिंदी पखवाड्याअंतर्गत १७ सप्टेंबर रोजी ‘हिंदी दिवस’ व्याख्यान, २१ सप्टेंबर रोजी श्रुतिलेखन व निबंध लेखन स्पर्धा, २२ सप्टेंबर रोजी काव्यवाचन व भाषणकला स्पर्धा, २५ सप्टेंबर रोजी चित्रकला स्पर्धा आणि २८ सप्टेंबर रोजी हिंदी घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
निबंध लेखन स्पर्धेसाठी ‘राष्ट्रीय एकता आणि हिंदी’, ‘स्वातंत्र्य आंदोलनात हिंदीची भूमिका’, ‘हिंदी आणि राष्ट्रीय भावना’, ‘भारतीय भाषा : विविधतेत एकतेचा आधार’ आणि ‘सामाजिक समतेसाठी हिंदी’ असे विषय देण्यात आले आहेत.
भाषण स्पर्धेसाठी ‘हिंदी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता : संधी व आव्हाने’, ‘युवा पिढी आणि हिंदीचे भविष्य’, ‘सोशल मीडियाच्या युगातील हिंदी’ आणि ‘हिंदी आणि भारतीय भाषा : संघर्ष नव्हे, सहअस्तित्व’ यांसारखे समकालीन विषय ठेवण्यात आले आहेत.
काव्यवाचन स्पर्धेत विद्यार्थ्यांना स्वरचित कवितांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. तसेच चित्रकला आणि घोषवाक्य लेखनाच्या माध्यमातून हिंदी भाषा, भारतीय संस्कृती, राष्ट्रीय एकात्मता आणि हिंदीचे भविष्य या विषयांवर विद्यार्थ्यांना आपली सर्जनशीलता व्यक्त करता येणार आहे.
हिंदी पखवाड्याची सांगता २९ सप्टेंबर २०२६ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारितोषिक वितरण समारंभाने होणार आहे. विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन हिंदी पखवाडा यशस्वी करावा, असे आवाहन हिंदी विभाग आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
