बाणेर पोलिसांनी केअर टेकरसह तिघांना केली अटक
वयस्कर आईला जीवे मारण्याची धमकी देऊन १ कोटी ९५ लाखांचा अपहार : मृत्युपत्र करण्यासाठी दबाव
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वयस्कर आईसाठी नेमलेल्या केअर टेकरने आईला नीट उपचार देणार नाही, अशी भीती घालून तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि रोकड असा १ कोटी ९५ लाख ४७ हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून बाणेर पोलिसांनी महिला केअर टेकरसह तिघांना अटक केली आहे.
माधवी शशिकांत पवार (वय ४९), जोशुआ शशिकांत पवार (वय ३१) आणि भाग्यश्री जोशुआ पवार (वय ३४, तिघे रा. स्काय ऑकविला सोसायटी, योगी पार्क, बाणेर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत एका ४७ वर्षीय तरुणाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार फेब्रुवारी ते १५ सप्टेंबर २०२६ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची ८२ वर्षीय आई एकत्र राहतात. फिर्यादी अविवाहित आहेत. आईच्या देखभालीसाठी माधवी पवार हिला ठेवण्यात आले होते. त्यावेळी ते मॉडेल कॉलनीत राहत होते. माधवी हिने देखभाल करत असल्याचा बहाणा करून आईचा विश्वास संपादन केला. ती आईसोबत सतत राहत असे. तिला ३५ हजार रुपये पगार देण्यात येत होता.
आईशी गोड बोलून तिने त्यांच्या मालमत्तेची माहिती घेतली. त्यांनी मॉडेल कॉलनी व डेक्कन येथील घरे विकसनासाठी दिली. त्याच्या डिपॉझिटचे अडीच कोटी रुपये त्यांना मिळाले. माधवी हिने घरभाडे परवडत नाही, असे सांगून तिचा मुलगा जोशुआ व सून भाग्यश्री पवार यांना बाणेरमधील घरी आणले.
माधवी हिने फिर्यादी यांच्याबरोबर जॉइंट खाते काढायला लावले. माधवी, तिचा मुलगा व सून यांनी त्यांना वारंवार ब्लॅकमेल करून ५ लाख रुपये बक्षिसी म्हणून घेतले. तसेच आईच्या लॉकरमधील ५० लाख रुपयांचे दागिने घरी आणून ठेवले होते. त्यामध्ये ८५० ग्रॅम सोन्याचे दागिने व ५ किलो चांदीच्या वस्तू होत्या. दोन दिवसांनी पाहिल्यावर कपाटात दागिने नव्हते. त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की, “तुम्ही दोघे वेडे आहात, तुम्हाला दागिन्यांची काय किंमत आहे,” असे म्हणत शिवीगाळ केली.
माधवी व आईचे जॉइंट खाते काढले होते. त्यातून तिने पैसे काढून घेतले. जोशुआ पवार हा पूर्वी रिक्षाचालक म्हणून काम करत होता. त्याने फिर्यादीची फसवणूक करून त्या पैशातून अनेक दुचाकी व चारचाकी वाहने खरेदी केली. माधवी हिचा पगार ३५ हजार रुपये ठरला असताना त्यांच्यावर दबाव टाकून तो जबरदस्तीने ६० हजार रुपये करण्यात आला.
मागील काही दिवसांपासून तिने आईला व फिर्यादीला त्यांच्या मालमत्तेबाबत व बँक खात्याबाबत त्यांच्या नावे मृत्युपत्र करून देण्यासाठी दबाव आणला. तसेच आईला चांगले उपचार देत नाहीत, असे फिर्यादीत म्हटले आहे.
माधवी पवार व तिचा मुलगा, सून यांनी “तुमच्यावर खोट्या गुन्ह्यांच्या केसेस दाखल करून जेलमध्ये टाकू,” अशी धमकी दिली. तसेच त्या दोघांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन फिर्यादी व त्यांच्या आईच्या बँक खात्यातून पैसे काढणे, ठेवी मोडणे, चेकवर सह्या घेऊन पैसे काढणे असे प्रकार करून एकूण १ कोटी ४५ लाख ४७ हजार रुपये तसेच ८५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ५ किलो चांदीच्या वस्तू, असे एकूण १ कोटी ९५ लाख ४७ हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक शैला पाथरे तपास करीत आहेत.
हॉस्पिटलचे नाव सांगून गाठले पोलीस ठाणे
फिर्यादीच्या आईबरोबर माधवी किंवा तिची सून भाग्यश्री कायम बरोबर असतात. त्या दोघांना एकटे बोलू देत नाहीत. त्यांना घराबाहेर जाऊ देत नव्हते. त्यामुळे ते हा प्रकार कोणाला सांगू शकत नव्हते. फिर्यादी यांनी हॉस्पिटलला जायचे असल्याचे सांगून घराबाहेर पडले. बाहेर आल्यानंतर त्यांनी मित्राला बोलावून घेतले. त्याला ही सर्व हकीकत सांगून त्यांनी बाणेर पोलीस ठाणे गाठले. तेथे त्यांनी जबाब देऊन फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी तातडीने कारवाई करून तिघांना अटक केली.
