शिवाजीनगर न्यायालयात भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय आणि डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टचा संयुक्त उपक्रम
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे व एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, पुणे यांच्या सहकार्याने तसेच डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अशोका हॉल, जिल्हा न्यायालय, शिवाजीनगर येथे भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला न्यायाधीश, कोर्ट पोलीस कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी, अधिवक्ता तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष व उद्घाटक म्हणून अंजू शेंडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेश शाह, अध्यक्ष, दि पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशन व एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय उपस्थित होते.
शिबिरामध्ये न्यायाधीश, कोर्ट पोलीस कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी वर्ग, अधिवक्ता आणि इतर नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबिरास ३०० हून अधिक नागरिकांनी उपस्थित राहून नेत्र तपासणीचा लाभ घेतला.
यावेळी एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाचे डॉक्टर व व्यवस्थापन, डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टचे विश्वस्त व सदस्य, तसेच न्यायाधीश, कोर्ट पोलीस कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी आणि अधिवक्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष निमंत्रक म्हणून रेवती देशपांडे, सचिव – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे आणि संकेत शहा, अध्यक्ष – डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. राजेश शाह यांनी एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. दि पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशन व शासनाच्या सहकार्याने सन २००० मध्ये महम्मदवाडी-हडपसर येथे ‘एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल’ हे अत्याधुनिक नेत्र रुग्णालय उभारण्यात आले. या रुग्णालयात दरमहा सुमारे ७ हजार, तर वर्षाला सुमारे ८० हजार मोतीबिंदू तसेच डोळ्यांच्या इतर शस्त्रक्रिया केल्या जातात.
आत्तापर्यंत रुग्णालयाने साडेसात लाखांहून अधिक नेत्रशस्त्रक्रियांचा टप्पा पार केला असून, त्यापैकी साडेचार लाख शस्त्रक्रिया रुग्णालयामार्फत मोफत करण्यात आल्या आहेत. रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी, उपचार तसेच शस्त्रक्रिया शिबिरे नियमितपणे आयोजित केली जातात, अशी माहिती डॉ. शाह यांनी दिली.
यावेळी अंजू एस. शेंडे यांनी न्यायालयाच्या आवारात हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल डॉ. राजेश शाह आणि संकेत शाह यांचे आभार मानले.
एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय आणि डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट यांच्या सामाजिक बांधिलकीतून आरोग्य, शिक्षण आणि समाजोपयोगी क्षेत्रात विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
