रिक्षाचालकावर तीक्ष्ण शस्त्राने वार
लोहगावातील सीएनजी पंपावरील घटना : रांगेतील नंबरवरून वाद
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सीएनजी पंपावर रांगेत झालेल्या वादातून रिक्षाचालकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना लोहगाव भागात घडली. या प्रकरणी एका रिक्षाचालकाला लोहगाव पोलिसांनी अटक केली.
सुयोग दादाजी जाधव (वय ४९, रा. माळवाडी वस्ती, लोहगाव) असे गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या प्रकरणी रिक्षाचालक सुहास मारुती पालवे (वय २६, रा. वैष्णवी पार्क, गाडे वस्ती, वाघोली) याला अटक करण्यात आली.
याबाबत जाधव यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक जाधव हे लोहगाव-वाघोली रस्त्यावरील सीएनजी पेट्रोल पंपावर गुरुवारी (१७ सप्टेंबर) सकाळी साडेनऊच्या सुमारास आले होते.
सीएनजी भरण्यासाठी त्यांनी रिक्षा रांगेत लावली होती. त्या वेळी रिक्षा रांगेत लावण्यावरून वाद झाला. रिक्षाचालक पालवे याने शिवीगाळ केली.
रिक्षात ठेवलेल्या तीक्ष्ण शस्त्राने त्याने जाधव यांच्यावर वार केले. जाधव हे जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पसार झालेला रिक्षाचालक पालवे याला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करत आहेत.
