सहाय्यक फौजदाराला पदावनत करण्याची शिक्षा
जनसंपर्क अधिकारी पदाचा दुरुपयोग : तपास अधिकाऱ्यांना आंदेकर टोळीसह गंभीर गुन्हेगारासाठी फोन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे जनसंपर्क अधिकारी पदावर असताना पदाचा दुरुपयोग करून आंदेकर टोळीतील गुंडाला मदत करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर खटके तसेच अन्य गुन्ह्यांतील तपास अधिकाऱ्यांना फोन करून दबाव टाकण्याचा प्रयत्न करणारे सहाय्यक फौजदार प्रवीण घाडगे यांना दोन वर्षांसाठी पोलीस हवालदार पदावर पदावनत करण्यात आले आहे. अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते यांनी हा आदेश दिला आहे.
आंदेकर टोळीवर खून तसेच मोक्का गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्याकडे होता. या गुन्ह्यातील आरोपी अविनाश पवार याला चौकशीसाठी बोलावले होते.
प्रवीण घाडगे यांनी खटके यांना फोन करून, “अविनाश पवार माझ्या परिचयाचे आहेत, त्यांना तपासात मदत करा. काय असेल तर ते आपल्या सर्कलमधील आहेत. आपण त्यांना सांगू शकतो,” असे सांगितले.
जनसंपर्क अधिकारी पदावर असताना आंदेकर टोळीसारख्या कुख्यात टोळीविषयी तपास अधिकाऱ्यांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दबाव टाकून घाडगे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला आहे, असा आरोप ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले होते.
त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली. सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्यावर जसा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, तसाच प्रवीण घाडगे यांनी नाना पेठेत अनधिकृत होल्डिंग व इतर बांधकामांविषयी मोहीम राबवित असताना समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
तसेच अमर अनंत शेलार यांनी दिलेल्या अर्जाच्या प्रकरणात अवाजवी हस्तक्षेप करण्यासाठी काळे पडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे.
अशा प्रकारे आणखी काही प्रकरणांत चूक केल्याची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून माहिती घेऊन ती त्रयस्थ व्यक्तीला देत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
हे वर्तन पोलीस खात्याच्या शिस्तीला धरून नाही. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे जनसंपर्क अधिकारी (PRO) म्हणून कर्तव्य बजावत असताना त्या पदाचा दुरुपयोग केल्याने अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते यांनी सहाय्यक फौजदार प्रवीण विठ्ठल घाडगे यांना पोलीस हवालदार पदावर दोन वर्षांच्या कालावधीसाठी पदावनत करण्याची शिक्षा दिली आहे.
