गणेशोत्सवात मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी येरवड्यात रात्री ११ वाजता साधला नागरिकांशी मनमोकळा संवाद
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी १९ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता येरवडा पोलीस ठाण्याला अचानक सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यातील श्री गणेशाची आरती करून उपस्थित नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला.
पोलीस आयुक्त येरवडा पोलीस ठाण्यात येणार असल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच विघ्नहर्ता ट्रस्टचे समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित झाले.
आरतीनंतर पोलीस आयुक्तांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या व सूचना जाणून घेतल्या.
यावेळी डीजे-मुक्त दहीहंडी तसेच ईद-ए-मिलादचा सण शांततामय आणि सलोख्याच्या वातावरणात साजरा करण्यासाठी नागरिकांची सर्वसमावेशक सहमती मिळवून घेतल्याबद्दल येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे पोलीस आयुक्तांनी अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, कल्याणीनगर परिसरात ध्वनी प्रदूषणाविरोधात जनजागृती आणि कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मोनिका शर्मा व त्यांच्या टीमतर्फे येरवडा पोलिसांनी कल्याणीनगर परिसरात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल हस्तलिखित शुभेच्छा संदेश तयार करण्यात आला होता.
हा संदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते व त्यांच्या सहकाऱ्यांना प्रदान करण्यात आला.
सामान्य नागरिकांमध्ये सहजपणे मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्यावर कायदेशीर व प्रभावी उपाययोजना करणे आणि नागरिकांचा विश्वास संपादन करून लोकाभिमुख पद्धतीने काम करणे, या कार्यपद्धतीचे उपस्थित नागरिकांनी कौतुक केले.
नागरिकांचा विश्वास, पोलिसांचा सेवाभाव आणि कायद्याचा सन्मान या त्रिसूत्रीच्या माध्यमातून येरवडा पोलीस ठाण्याची लोकाभिमुख वाटचाल अशीच सुरू राहावी, अशा शुभेच्छांसह कार्यक्रमाची सांगता झाली.

