आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

औषध वितरकांची फसवणूक करणाऱ्या दोघा भामट्यांवर गुन्हा दाखल

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 21, 2026
Spread the love

पुणे : सदाशिव पेठेतील औषध वितरकांकडून लाखो रुपयांची उधारीवर औषधे घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या दोघांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनाली लक्ष्मण गिरीगोसावी (वय ४२, रा. अर्चना कोहिनूर ग्लोरी सोसायटी, महंमदवाडी) आणि जयेश वसंत जैन (वय ४१, रा. भक्तीपूजा अपार्टमेंट, महर्षीनगर, गुलटेकडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत टोनी अ‍ॅन्थोनी फर्नाडिस (वय ७३, रा. कॅम्प) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सदाशिव पेठेतील मीना फार्मा येथील दुकानात ६ मार्च २०२५ ते ३ मे २०२५ दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी टोनी फर्नाडिस यांचे सदाशिव पेठेत मीना फार्मा हे घाऊक औषध विक्रीचे दुकान आहे. त्यांचा विश्वास संपादन करून सोनाली गिरीगोसावी हिने औषधे खरेदी केली. त्यानंतर जयेश जैन याला उधारीवर औषधे देण्यास सांगितले. त्यांनी फिर्यादीकडून ६२ लाख ९९ हजार ४४ रुपयांची औषधे खरेदी केली. त्यांनी दिलेले धनादेश खात्यात पैसे नसल्याने परत आले. ते पैसे देतील, असे वाटल्याने त्यांनी जवळपास वर्षभर वाट पाहिली. तरीही पैसे न मिळाल्याने त्यांनी शेवटी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक विकास अडागळे तपास करीत आहेत.

अशी करत होते फसवणूक
सोनाली गिरीगोसावी या सदाशिव पेठेतील घाऊक औषध वितरकांकडून सुरुवातीला आपल्या दुकानासाठी औषधे खरेदी करून त्याचे पैसे देऊन त्यांचा विश्वास संपादन करत. त्यानंतर ४५ दिवसांची उधारी आणि ४ टक्के डिस्काऊंटवर माल खरेदी करण्यास सुरुवात करत. त्यातील काही रक्कम त्या वेळेवर देत.त्यानंतर जयेश जैन हा मोठमोठ्या संस्थांना औषधांचा पुरवठा करतो. त्याला माझ्याप्रमाणे उधारीवर माल द्यावा. त्याचे बिल मी देईन, असे सांगत. वितरकाकडून जयेश जैन कोट्यवधी रुपयांचा माल उचलत. उधारीची मुदत संपल्यानंतरही पैसे देत नसत. त्यांनी दिलेले धनादेश खात्यात पैसे नसल्याने बाऊन्स होत. २०२४ पासून त्यांनी हा फसवणुकीचा प्रकार सुरू केल्याचे दिसून आले आहे. त्यांच्यावर आतापर्यंत १८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल असून, त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.