खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत दागिने चोरी
खडकी बाजारमधील घटना : बुरखा घातलेल्या महिलेवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सोन्याची बाली खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफ दुकानात आलेल्या महिलेने हातचलाखी करून ९५ हजार रुपयांची सोन्याची बाली चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत चिराज महावीर मारलेचा (वय २५, रा. चिखलवाडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना खडकी बाजार येथील वर्धमान ज्वेलर्समध्ये ७ ऑगस्ट २०२६ रोजी घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने एक महिला काही दिवसांपूर्वी आली होती. महिलेने बुरखा परिधान केला होता.
महिलेने दागिने खरेदीचा बहाणा केला. तिने सोन्याची बाली दाखविण्यास सांगितले. फिर्यादी यांनी सोन्याची बाली असलेला ट्रे तिला पाहण्यास दिला.
सोन्याची बाली पाहत असताना तिने हातचलाखीने ट्रेमधील ९५ हजार रुपयांची एक जोड चोरली. फिर्यादी यांना ही बाब तेव्हा लक्षात आली नाही. त्यानंतर दागिन्यांचे ऑडिट करीत असताना त्यांना सोन्याची बाली कमी असल्याचे आढळून आले.
त्यावरून या महिलेने सोन्याची बाली चोरून नेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मुद्दसर पटेल तपास करीत आहेत.
