आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दोघा चार्टर्ड अकाउंटंटवर गुन्हा दाखल

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 21, 2026
Spread the love

पुणे : परदेशात पैसे पाठविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी न करता तीन शेल कंपन्यांसाठी खोटे प्रमाणपत्र तयार करून ४,४२७ कोटी ९२ लाख ४४ हजार ४०८ रुपये परदेशात पाठवून शासनाचा कर चुकवून फसवणूक केल्याच्या आरोपावरून एम. एस. ओडी अँड असोसिएट्स या फर्मच्या दोघा संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंकुश कुमार सुरेशचंद बगरेचा (वय ३४, रा. आचलनगर, कोंढवा), मोहित शिवकुमार तोडी (वय ३३, रा. कोंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत आयकर विभागाच्या सहायक संचालक तन्मयी सुहास देसाई (वय ३१, रा. निगडी प्राधिकरण) यांनी कोंढवा-येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हा प्रकार एम. एस. ओडी अँड असोसिएट्सच्या कात्रज-कोंढवा रोडवरील शिवसमृद्धी आर्केड येथील कार्यालयात २०२२ ते २०२६ दरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुश बगरेचा आणि मोहित तोडी हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत.

त्यांची एम. एस. ओडी अँड असोसिएट्स नावाची फर्म आहे. परदेशात पैसे पाठविताना फॉर्म १५ सीबी भरावा लागतो. सीए पैशांचा स्रोत आणि टीडीएस दर तपासतात.

या दोघांनी व इतरांनी आपापसात संगनमत करून त्यांच्याकडील शेल/बोगस कंपन्यांच्या कोणत्याही प्रकारच्या व्यवहाराची कागदपत्रे सादर केली नाहीत.

आर्थिक वर्ष २०२२-२३, २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या कालावधीत परदेशी चलन पाठविण्यासाठी आवश्यक असणारे फॉर्म १५ सीबी प्रमाणपत्र कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी न करता खोटे प्रमाणपत्र तयार करून ते खरे असल्याचे भासवून आयकर विभागाला सादर केले.

तसेच, फॉर्म १५ सीए प्रमाणपत्र तयार करण्याचा अधिकार नसतानाही त्यांनी ते बेकायदेशीररित्या तयार करून पोर्टलवर सादर केले. फसवणुकीच्या उद्देशाने त्यांनी तीन कंपन्यांच्या फायद्यासाठी चार आर्थिक वर्षांत एकूण ४,४२७ कोटी ९२ लाख ४४ हजार ४०८ रुपये परदेशात पाठवून या रकमेच्या संदर्भात शासनाचा कर चुकवून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. आयकर विभागाने याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यावरून कोंढवा-येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.