आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दिव्यांगाच्या मदतीच्या बहाण्याने रोकड चोरी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 21, 2026
Spread the love

पुणे : बँकेत भरणा करण्यासाठी व्हिलचेअरवर असलेल्या बँक खातेदाराला मदत करतो, असे सांगून एका चोरट्याने खात्यात पैसे भरण्याऐवजी पैसे घेऊन पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत एका ५० वर्षीय दिव्यांग व्यक्तीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना खडकी येथील बँक ऑफ बडोदा येथे १५ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दिव्यांग असून ते खडकीतील रेंजहिल्स परिसरात राहतात. ते १५ सप्टेंबर रोजी दुपारी औंध रोडवरील बँक ऑफ बडोदा शाखेत पैसे भरण्यासाठी व्हिलचेअरवरून आले होते. चोरट्याने त्यांना पैसे भरण्यासाठी मदत करतो, असे सांगून त्यांच्याकडून पैसे भरण्याची स्लिप व पैसे घेतले. पैसे भरल्याचा बहाणा करून त्यांना स्लिपचा अर्धा भाग आणून दिला. त्यांनी त्यावर बँकेचा शिक्का आहे की नाही, हे पाहिले नाही. स्लिपचा अर्धा भाग देऊन तो चोरटा बँकेतून निघून गेला.

त्यानंतर काही दिवसांनी त्यांना खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे दिसून आले. तेव्हा चोरट्याने पैसे खात्यात भरले नसल्याचे समजले. त्यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बँकेतील व परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण मागविले असून पोलीस हवालदार सूर्यवंशी तपास करीत आहेत.