आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गणेशोत्सवात महिलांचे दागिने लांबविले

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 22, 2026
Spread the love

पुणे : गणेशोत्सवात आरास पाहण्यासाठी आलेल्या भाविक महिलांचे दागिने लांबविण्यात आल्याच्या घटना घडल्या. या ५ घटना शनिवारवाडा, बाबू गेणू मंडळ आणि दगडूशेठ हलवाई मंडळाजवळ घडल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर दोन महिलांच्या गळ्यातील दागिने लांबविण्यात आले. याबाबत कोथरूड भागातील एका महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर शनिवारवाड्याजवळ विविध वस्तूंची विक्री करणारी तात्पुरती दुकाने थाटण्यात आली आहेत.

महिला रविवारी (२० सप्टेंबर) खरेदी करत होती. त्या वेळी गर्दीत महिलेच्या गळ्यातील ३८ हजार रुपयांचे दागिने लांबविण्यात आले. याच परिसरात आणखी एका महिलेचे दागिने लांबविण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या उत्सव मंडपाच्या परिसरात एका महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरण्यात आल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली.

याबाबत खडकी भागात राहणाऱ्या एका महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास हुतात्मा बाबू गेणू मंडळाच्या उत्सव मंडप परिसरात एका महिलेचे १२ हजार रुपयांचे जुने मंगळसूत्र लांबविण्यात आले.

याबाबत महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याच परिसरात चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले.

तक्रारदार महिला मूळची नांदेडची रहिवासी असून, ती १८ सप्टेंबर रोजी दर्शनासाठी आली होती. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.