आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पोस्कोच्या गुन्ह्यातील फरार गुन्हेगार जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 22, 2026
Spread the love

पुणे : पाटील इस्टेट येथील एका अल्पवयीन मुलीचे कपडे फाडून तिच्या आईला धमकी दिल्याप्रकरणी पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेल्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने कॅम्पमधून अटक केली आहे.

अबालू जाफर इराणी (वय ५०, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पाटील इस्टेटमध्ये अबालू इराणी याने फिर्यादीचे केस ओढून त्यांना पोटात, कमरेवर व छातीवर लाथ मारून, तसेच हाताने त्यांच्या छातीवर मारहाण केली. तसेच फिर्यादीचे कपडे फाडून तिच्या आईला धमकी दिली होती. खडकी पोलिसांनी पोस्कोअंतर्गत अबालू इराणी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून तो फरार होता.

गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पथक पाहिजे असलेल्या फरारी आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार बाबासाहेब दांगडे यांना पोस्को गुन्ह्यातील फरार आरोपी अबालू इराणी हा कॅम्पमधील साहिल हॉटेलसमोर थांबला असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथक तेथे गेले. आरोपीचा शोध घेत असताना तो साहिल हॉटेलसमोर थांबलेला दिसला. पोलिसांना पाहून तो घाईघाईने निघून जाऊ लागला. पोलिसांनी त्याला पळून जाण्याची संधी न देता जागेवरच पकडले. पुढील कारवाईसाठी त्याला खडकी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक धीरज राऊत, पोलीस अंमलदार बाबासाहेब दांगडे, प्रमोद जगताप, संतोष नांगरे, संतोष अनुसे आणि आशिष शेलार यांनी केली आहे.