आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दरोड्याच्या तयारीतील ५ जण जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 22, 2026
Spread the love

पुणे : एरंडवणे येथील एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर दरोड्याच्या तयारीने जमलेल्या पाच जणांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचे दोन साथीदार पळून गेले आहेत.

रितेश गुरुनाथ चिप्पा (वय २५, रा. महात्मा फुले वाड्यासमोर, समता भूमी, गंजपेठ), विकास नितीन लांबोर (वय १९, रा. खिलारेवाडी), प्रतीक हनुमंत कांबळे (वय १९, रा. गणेशनगर, एरंडवणे), प्रतीक रामचंद्र कदम ऊर्फ बाब्या (वय २३, रा. खिलारेवाडी), सुजल मनोज मोरे (वय १९, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रचित काकडे आणि साहिल काळे (दोघे रा. खिलारेवाडी) हे पळून गेले आहेत.

ही कारवाई एरंडवणे येथील अचानक मित्र मंडळ (चावडी) या इमारतीच्या वरील मजल्यावर सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याबाबत पोलीस हवालदार सचिन सिद्धेश्वर गायकवाड (वय ४५) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फरारी आणि तडीपार गुन्हेगारांची डेक्कन पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाकडून सोमवारी सायंकाळी तपासणी सुरू होती. त्यावेळी एरंडवणे येथील एका इमारतीत काही जण जमले असून ते दरोड्याची तयारी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने इमारतीवर छापा घातला. पोलिसांनी तेथील पाच जणांना पकडले. त्या गडबडीत दोन जण पळून गेले. पोलिसांनी त्यांच्याकडून सात कोयते, दोन काडेपेट्या, दोन लायटर, लाल रंगाचा कापडी पट्टा, चटणी पावडर आणि तीन मोबाईल जप्त केले आहेत. पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे तपास करीत आहेत.