एक असाही विसर्जन सोहळा
आंबेगाव पोलीस ठाण्यात गणेशोत्सव २०२६ उत्साहात : वारकरी आणि ढोल-ताशा पथकाने वेधले लक्ष
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आंबेगाव पोलीस ठाण्यात श्री गणेशाची स्थापना करण्यात आली होती. दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आंबेगाव पोलीस ठाण्यातर्फे श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर मिरवणूक आदर्श आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांचा मानस होता. त्यामुळे मिरवणुकीत वारकरी पथक आणि ढोल-ताशा पथकाचा समावेश करण्यात आला होता. यासाठी खास आळंदी येथून वारकरी पथक बोलावण्यात आले होते.
टाळ-मृदंगाच्या वादनासह हरिनामाचा जयघोष करत भक्तिमय वातावरणात मिरवणुकीला सुरुवात झाली. त्याचबरोबर ढोल-ताशा पथकाने पारंपरिक वाद्यांचे सुरेख वादन सादर केले. श्री गणेशासाठी खास सजवलेल्या बैलगाडीचेही नियोजन करण्यात आले होते.
ही मिरवणूक आंबेगाव पोलीस ठाणे ते शनिनगर चौक, टेल्को कॉलनी चौक, जांभूळवाडी रोडमार्गे जांभूळवाडी तलाव या मार्गावर काढण्यात आली.
लहान मुलांचे वारकरी पथक तसेच ढोल-ताशा पथकामुळे आंबेगाव पोलीस ठाण्याच्या या मिरवणुकीचे परिसरात विशेष कौतुक होत असून, ती एक आदर्श मिरवणूक म्हणून पाहिली जात आहे.
सदर मिरवणुकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चांगदेव सजगणे, सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे, फिरोज मुलानी, महेश नाईकवाडी, स्वाती देवधर, अश्विनी पाटील, प्रियांका गोरे, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे, मारुती वाघमारे, नीतीराज थोरात, लक्ष्मण डोईफोडे, सुनीता काकुर्ले तसेच पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
याशिवाय महिला दक्षता समितीचे सदस्य, मोहल्ला कमिटीचे सदस्य, अल्पसंख्याक समितीचे सदस्य, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.
