पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेल्या कामगाराचा मृत्यू
ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल : बी. जे. मेडिकल कॉलेज वसतिगृहातील घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बी. जे. मेडिकल कॉलेजची जीर्ण झालेली पाण्याची टाकी पाडताना टाकीचा भाग अंगावर पडून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी ठेकेदाराविरुद्ध हलगर्जीपणाचा आरोप ठेवून गुन्हा दाखल केला आहे.
सुरेश शंकर शिंदे (वय ४५, रा. पानिव, मु. पो. यशवंतनगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे मृत्यू पावलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ वसंत शिंदे (वय ३५) यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी ठेकेदार मुकेश चव्हाण (रा. माळशिरस, ता. सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बी. जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजता घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बी. जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहातील पाण्याची जुनी टाकी जीर्ण झाली होती. ती कधीही पडून दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
त्यामुळे ही टाकी पाडण्याचे काम मुकेश चव्हाण यांच्याकडे देण्यात आले होते. सुरेश शिंदे व त्यांचे सहकारी ही टाकी पाडत असताना अचानक टाकीचा एक भाग कोसळला.
त्याच्या ढिगाऱ्याखाली सुरेश शिंदे अडकून जखमी झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना २१ सप्टेंबर रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करीत आहेत.
