जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायकाला कारावास
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई : न्यायालयाने ठोठावली ३ वर्षांची शिक्षा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कनिष्ठ लिपिक पदाची वैयक्तिक मान्यतेची फाईल तयार करून वरिष्ठांकडे सादर करण्यासाठी लाच घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायकाला न्यायालयाने तीन वर्षांची सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
गिरीशचंद्र सुदामराव वाघमारे (रा. नालंदानगर, विजापूर रोड, सोलापूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. वाघमारे हे सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षण विभाग (माध्यमिक) येथे वरिष्ठ सहायक म्हणून कार्यरत होते. ही घटना २०२१ मध्ये घडली होती.
तक्रारदार यांच्या कनिष्ठ लिपिक पदाच्या वैयक्तिक मान्यतेची फाईल तयार करून वरिष्ठांकडे सादर करण्यासाठी वाघमारे यांनी ८ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि गिरीशचंद्र वाघमारे यांना पकडण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास करून तत्कालीन पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांनी आरोपीविरुद्ध सोलापूर विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश डी. एन. सुरवसे यांच्यासमोर झाली. न्यायाधीश सुरवसे यांनी वाघमारे यांना दोषी ठरवून तीन वर्षांची सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. प्रकाश जन्नू, तर आरोपीतर्फे अॅड. सुरेश पाटील कुरुलकर यांनी काम पाहिले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून पोलीस अंमलदार मधुमती शिंदे आणि गायकवाड यांनी काम पाहिले.
