आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सायबर चोरट्याचे चीन कनेक्शन आले समोर

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 23, 2026
Spread the love

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या नावाने बोलत असल्याचे भासवून अकाउंटंट मॅनेजरला विविध बँक खात्यांमध्ये रक्कम ट्रान्सफर करण्यास लावून १ कोटी ९५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर टोळीतील पाचव्या आरोपीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या सायबर चोरट्याचे चीन कनेक्शन समोर आले आहे.

रोहन रामेश्वर जाधव (रा. संभाजीनगर) असे अटक केलेल्या सायबर चोरट्याचे नाव आहे. सायबर पोलिसांनी यापूर्वी चार जणांना अटक केली आहे.

कोथरूडमधील बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात ही घटना २८ आणि २९ जानेवारी २०२६ रोजी घडली होती. कंपनीच्या मालकाच्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर करून सायबर चोरट्यांनी कंपनीच्या कामासाठी दोन बँक खात्यांमध्ये रक्कम पाठवण्यास सांगितले. त्यानुसार १ कोटी ९५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान फिर्यादींची रक्कम ज्या-ज्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर झाली, त्या सर्व बँकांशी तात्काळ ई-मेलद्वारे पत्रव्यवहार करून संबंधित बँक खाती डेबिट तसेच लियन फ्रिज करण्यात आली.

या फसवणुकीच्या एकूण रकमेपैकी ९५ लाख रुपये अॅक्सिस बँकेच्या खात्यात ट्रान्सफर झाले होते. या खात्यातून ही रक्कम ज्या-ज्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर झाली, त्याच्या ट्रेलचा तपास करण्यात आला. तसेच बँकांकडून प्राप्त झालेली माहिती, ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. या तपासातून या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

त्यापैकी रोहन जाधव याचे चीन कनेक्शन असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच, उर्वरित एक कोटी रुपयांच्या व्यवहाराच्या ट्रेलचा तपास सुरू आहे. या गुन्ह्यातील एकूण ५० लाख २६ हजार १७१ रुपये परत मिळवून देण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त विवेक मासाळ आणि सहायक पोलीस आयुक्त शुभदा संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संगीता देवकाते व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे.