आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अलका टॉकीज चौकात आंदोलनास परवानगी नाकारली

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 23, 2026
Spread the love

पुणे : एमपीएससी अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी अलका टॉकीज चौकात २७ सप्टेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. अलका टॉकीज चौकात आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी पर्यायी जागा सुचविल्याचे त्यांनी सांगितले.

एमपीएससी अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी २७ सप्टेंबर रोजी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे.

याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, सुरुवातीला २६ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्यात येणार होते. परंतु, विसर्जन मिरवणूक व पोलिसांवरील अतिरिक्त ताण लक्षात घेता पोलिसांनी त्यांना तसे सांगितले.

त्यानंतर त्यांनी २७ सप्टेंबर रोजी अलका टॉकीज चौकात आंदोलन करण्याचे जाहीर केले. याबाबत मंगळवारी रात्री उशिरा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा झाली.

अलका टॉकीज चौकात आंदोलन झाल्यास वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न उद्भवतो. त्यामुळे या ठिकाणी कोणालाही कोणत्याही परिस्थितीत आंदोलनाला परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे आंदोलनकर्त्यांना स्पष्ट केले आहे.

त्यांना आंदोलन करायचे असेल तर जिल्हाधिकारी कार्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या पर्यायी जागा सुचविल्या आहेत, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

आमदार रोहित पवार यांनी एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याबरोबरच अन्य पाच मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेणे, राजस्थान सरकारच्या धर्तीवर १०० रुपयांच्या कार्डावर वर्षभरात सर्व परीक्षा घेण्यात याव्यात, तसेच ७० हजार पदांची भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी, अशा विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी आंदोलनावर विद्यार्थ्यानी ठाम आहेत.