विसर्जन मिरवणुकीत मंडळांना २ ढोल पथकांना परवानगी
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती; चौकात फक्त १० मिनिटे स्थिर वादन करता येणार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक मंडळाला जास्तीत जास्त दोन ढोल पथकांना सहभागी करून घेता येणार आहे. या पथकातील सदस्यांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आलेली नसली, तरी पथक खूप मोठे नसावे, अशा सूचना मंडळांना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक चौकात ढोल-ताशा पथकाला केवळ १० मिनिटे स्थिर वादनाची परवानगी दिली जाणार आहे. याबाबत प्रमुख चार विसर्जन मिरवणूक मार्गांवर सहभागी होणाऱ्या ६३८ गणेश मंडळे तसेच ढोल पथकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली असून, सर्वांना पाळता येतील, असे नियम तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सवाचा उत्साह आता वाढत असून, सर्वांना विसर्जन मिरवणुकीचे वेध लागले आहेत. जगभरातील गणेशभक्तांचे आकर्षण असलेली आणि सुमारे ३६ तास चालणारी विसर्जन मिरवणूक हा पोलिसांच्या दृष्टीने मोठा बंदोबस्ताचा विषय असतो. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्ताची माहिती दिली. यावेळी पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, राजेश बनसोडे, मनोज पाटील, संजय पाटील तसेच अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, यावर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रोडवरून २६७ मंडळे, टिळक रोडवरून २३१ मंडळे, केळकर रोडवरून ७९ मंडळे आणि कुमठेकर रोडवरून ५० गणेश मंडळे सहभागी होणार आहेत. अशा प्रकारे मुख्य चार विसर्जन मिरवणूक मार्गांवर एकूण ६३८ गणेश मंडळे सहभागी होतील. या विसर्जन मिरवणुकीसाठी १० हजार पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. बंदोबस्ताची आखणी पूर्ण झाली असून, त्याची पाहणी गुरुवारी सायंकाळी करण्यात येणार आहे.
ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी ११२ पथके
गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषण होऊ नये आणि निर्धारित मर्यादेतच आवाजाची पातळी राहावी, यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. ध्वनी मर्यादा ओलांडणाऱ्या २४ मंडळांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली असून, त्यांची साऊंड सिस्टीम जप्त करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत ४,५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
विसर्जन मिरवणुकीत टोल, प्लाझ्मा, प्रेशर माईक आणि लेझर लाईटला बंदी घालण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांच्या साऊंड सिस्टीमची अगोदरच तपासणी करण्यात येणार आहे. ध्वनी प्रदूषणाची मर्यादा ओलांडली जाऊ नये, यासाठी चारही विसर्जन मिरवणूक मार्गांवर विविध ठिकाणी ११२ पथके तैनात करण्यात येणार आहेत.
गर्दीचे व्यवस्थापन हे सर्वात मोठे आव्हान
विसर्जन मिरवणुकीदरम्यान होणारी गर्दी आणि तिचे व्यवस्थापन करणे हे पोलिसांसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. त्या दृष्टीने अलका टॉकीज चौक, बेलबाग चौक ते मंडई परिसरात कोणतीही गडबड किंवा गोंधळ होऊ नये, यासाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे. एकाच वेळी एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ नये, यासाठी चारही विसर्जन मिरवणूक मार्गांवरील गणेश मंडळांचे नियोजन करण्यात आले आहे.
क्राउड मॅनेजमेंटसाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच एआय-आधारित कॅमेरे विसर्जन मिरवणूक मार्गावर तैनात करण्यात आले आहेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून विसर्जन मिरवणुकीतील गर्दीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
विसर्जन मिरवणुकीत दोन ढोल पथकांना परवानगी देण्यात आली असली, तरी त्या पथकातील सदस्यसंख्येवर कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही. मात्र, ही ढोल पथके खूप मोठी नसावीत, अशा सूचना मंडळांना देण्यात आल्या आहेत.
विसर्जन मिरवणूक किती तास चालली, यापेक्षा ती शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडणे, याकडे पोलिसांचे सर्वाधिक लक्ष असणार आहे.
बेलबाग चौक ते अलका टॉकीज चौकादरम्यान मंडळांनी आपली मिरवणूक साडेतीन ते चार तासांत पूर्ण करावी, अशी अपेक्षा आहे. पहिले मानाचे गणपती आपली मिरवणूक साधारण साडेतीन तासांत पूर्ण करतात. यावेळीही हे गणपती आपल्या निर्धारित वेळेत विसर्जन मिरवणूक पार पाडतील, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
विसर्जन मिरवणूक बंदोबस्तातील महत्त्वाच्या बाबी
- विसर्जन मिरवणुकीसाठी १० हजार पोलीस अधिकारी व अंमलदारांचा बंदोबस्त.
- कसबा गणपतीची मिरवणूक सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणार.
- चार मिरवणूक मार्गांवर ६३८ मंडळे सहभागी होणार.
- गर्दीच्या व्यवस्थापनासाठी विशेष नियोजन.
- प्रत्येक मंडळाला दोन ढोल पथकांना परवानगी; सदस्यसंख्येवर मर्यादा नाही.
- प्रत्येक चौकात केवळ १० मिनिटे स्थिर वादनास परवानगी.
- वादनानंतर चौकातून पुढे जाण्यासाठी ५ मिनिटांचा वेळ.
- टोल, प्लाझ्मा, प्रेशर माईक आणि लेझर लाईटला पूर्णपणे बंदी.
- विसर्जन मिरवणूक किती तास चालली, यापेक्षा गर्दीमुळे कोठेही धक्काबुक्की किंवा चेंगराचेंगरी होऊ नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात येणार.
