आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

नेहरू रस्त्यावरील प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम लवकर सुरू करण्याची मागणी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 24, 2026
Spread the love

पुणे : मार्केट यार्ड परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता नेहरू रोडवरील वखार महामंडळ चौक ते गंगाधाम चौक आणि पुढे आईमाता मंदिरापर्यंत प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम लवकर सुरू करण्याची मागणी दि पूना मर्चंट्स चेंबरने केली आहे. याबाबत नगर विकास विभागाच्या राज्यमंत्री व पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ, पुणे महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले.

मार्केट यार्ड परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या यामुळे नेहरू रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.

पूर्वी मार्केट यार्डमध्ये १० ते १२ टन क्षमतेचे ट्रक येत होते. आता ३० टन क्षमतेचे मोठे ट्रक येत असून त्यांची रुंदीही अधिक आहे. दुकानांसमोर माल उतरविण्यासाठी ट्रक उभे राहिल्याने वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो.

कात्रज-कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणात नवीन गृहसंकुले विकसित झाल्याने या भागातून मार्केटयार्डकडे येणाऱ्या वाहनांची संख्याही वाढली आहे.

त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी चेंबरने केली आहे.

वखार महामंडळ चौक ते गंगाधाम चौक आणि पुढे आईमाता मंदिरापर्यंत उड्डाणपूल उभारल्यास बाजाराशी संबंधित वाहने पुलाखालील मार्गाने बाजार आवारात ये-जा करू शकतील, तर इतर वाहने उड्डाणपुलावरून पुढे जाऊ शकतील.

पुलाची रचना मध्यभागी एकाच खांबावर आधारित असावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. उड्डाणपुलाचे नियोजन करताना मार्केट यार्डमधील अवजड वाहनांची वाहतूक लक्षात घेण्यात यावी.

तसेच बाजार आवारातील प्रवेश व बाहेर पडण्याच्या गेटजवळ वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रस्तावित उड्डाणपुलाचा आराखडा ३डी स्वरूपात उपलब्ध करून दिल्यास व्यापारी आणि संबंधितांना प्रकल्पाची अधिक स्पष्टता मिळेल.

पुलाचे काम कमीत कमी वेळेत पूर्ण करावे. तसेच काम सुरू असताना मार्केट यार्डमधील दैनंदिन व्यवहार सुरळीत राहतील, याची दक्षता घ्यावी, अशी मागणीही चेंबरने केली आहे.

या उड्डाणपुलासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू असून नागरिकांच्या सोयीसाठी याबाबत लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांची चेंबरच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन साद केले व याबाबत चर्चा केली.

यावेळी दि पूना मर्चंट्स चेंबरचे सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुगड, माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले, दिनेश मेहता, शाम लढ्ढा आणि प्रणव गुगळे उपस्थित होते.

सदर उड्डाणपुलाबाबत बिबवेवाडी वाहतूक विभाग, पुणे शहर परिमंडळ ३ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे यांचा अभिप्रायही निवेदनासोबत जोडण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर चर्चा करून प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर योग्य निर्णय घेण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती दि पूना मर्चंट्स चेंबरचे सचिव ईश्वर नहार यांनी दिली.