मार्केटयार्डमधील व्यापार्यावर भरदिवसा हल्ला
सॅलसबरी पार्कमधील घटनेत व्यापारी गंभीर जखमी : ५ लाखांची बॅग चोरून नेण्याचा हल्लेखोरांचा प्रयत्न
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मार्केटयार्डवरून दुचाकीवर घरी जात असताना पाठीमागून आलेल्या तिघा चोरट्यांनी व्यापार्यावर कोयत्याने वार करून त्यांच्याकडील पैशांची बॅग हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. या घटनेत व्यापारी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अॅडव्हान्टिस्ट हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
राजेश दशरथलाल ओसवाल (वय ५८, रा. अलका पॅराडाईज, संभवनाथ जैन मंदिराजवळ, सॅलसबरी पार्क) असे जखमी झालेल्या व्यापार्याचे नाव आहे. ही घटना सॅलसबरी पार्क येथील गोलीवाला भवनसमोर बुधवारी दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश ओसवाल यांचे मार्केटयार्डमध्ये स्क्रॅप व इन्व्हर्टर बॅटरीचे दुकान आहे. ते एका बॅगेत सुमारे ५ लाख रुपये घेऊन दुचाकीवरून घरी निघाले होते.
मार्केटयार्डवरून ते सॅलसबरी पार्क येथील घराजवळ आले होते. त्याच वेळी पाठीमागून एका दुचाकीवर तिघे जण आले. त्यांनी राजेश ओसवाल यांच्या दुचाकीला आपली दुचाकी आडवी घालून त्यांना थांबविले.
त्यांच्यातील एकाने बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. राजेश ओसवाल यांनी त्यांना प्रतिकार करत बॅग धरून ठेवली. तेव्हा चोरट्यांनी त्यांच्या पाठीवर, बरगडीवर कोयत्याने सपासप वार केले. जखमी होऊन ते खाली पडले.
परंतु, त्यांनी हातातील बॅग सोडली नाही. तेव्हा चोरटे तसेच पळून गेले. त्यानंतर राजेश ओसवाल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गणेशोत्सवात भरदिवसा व्यापार्यावर हल्ला करून रोकड चोरून नेण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. सहायक पोलीस आयुक्त गजानन पवार, स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांनी रुग्णालयात भेट देऊन राजेश ओसवाल यांच्याकडून माहिती घेतली.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पाळत ठेवून लुटण्याचा हा प्रयत्न चोरट्यांनी केला असावा, असा पोलिसांचा कयास आहे. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र जगदाळे तपास करीत आहेत.
