आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त रक्तदान शिबिर

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 24, 2026
Spread the love

भूम : शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. भगवंत ब्लड बँक, बार्शी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरात एकूण ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून भगवंत ब्लड बँक, बार्शीचे गणेश जगदाळे उपस्थित होते.

यावेळी गणेश जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना रक्तदानाचे महत्त्व, रक्तदानाविषयी असलेले गैरसमज तसेच रक्तदानामुळे गरजू रुग्णांना होणारी मदत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. काळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अमोल कुटे यांनी केले. यावेळी प्रा. बोराडे, डॉ. सुरवसे, प्रा. नंदू जगदाळे, प्रा. मंगेश खराटे, डॉ. नितीन पडवळ, प्रा. पवार, डॉ. गायकवाड यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘रक्तदान हे श्रेष्ठदान असून, आपल्या रक्ताच्या एका थेंबामुळे एखाद्याचे जीवन वाचू शकते,’ या सामाजिक संदेशातून राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले.