विसर्जन मिरवणुकीदरम्यान २६ ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गणेशोत्सव आणि मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक शाखेने नागरिकांसाठी शहरातील २६ ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शहरासह उपनगरांतून मोठ्या संख्येने नागरिक मध्यवर्ती भागात येत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे.
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सुरू होणार आहे. देखावे, रोषणाई आणि विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी पार्किंगचे नियोजन केले आहे.
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, छत्रपती शिवाजी महाराज आखाडा वाहनतळ, गोखले प्रशाला, एआयएसएसएमएस मैदान-आरटीओ चौक, एस. पी. कॉलेज, पेशवे पार्क-सारसबाग, पाटील प्लाझा, बीएमसीसी कॉलेज मैदान, आबासाहेब गरवारे कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, मराठवाडा कॉलेज, काँग्रेस हाऊस रस्ता आणि न्यू इंग्लिश स्कूल टिळक रस्ता यांसह विविध ठिकाणी पार्किंग उपलब्ध राहणार आहे.
तसेच नदीपात्रातील भिडे पूल ते गाडगीळ पूल परिसरातही दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. काही वाहनतळ केवळ दुचाकींसाठी, तर काही ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी दोन्ही वाहनांसाठी पार्किंगची सुविधा देण्यात आली आहे.
विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी रस्त्यावर किंवा अनधिकृत ठिकाणी वाहने उभी न करता केवळ निर्धारित वाहनतळांवरच वाहने पार्क करावीत, असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेने केले आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असेही वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे.
या प्रमुख रस्त्यांवर वाहनतळ बंदी
मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक पोलिसांनी २४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजल्यापासून मुख्य मिरवणूक संपेपर्यंत शहरातील १० प्रमुख रस्त्यांवर वाहनतळ बंदी लागू केली आहे.
पोलीस, अग्निशामक दल, रुग्णवाहिका आणि महावितरणच्या वाहनांव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या वाहनांना या मार्गांवर उभे करण्यास मनाई असेल.
वाहनतळ बंदी पुढील रस्त्यांवर लागू राहणार आहे :
लक्ष्मी रस्ता: संत कबीर चौक ते अलका टॉकीज चौक
केळकर रस्ता: बुधवार चौक ते अलका टॉकीज चौक
कुमठेकर रस्ता: शनिपार चौक ते अलका टॉकीज चौक
टिळक रस्ता: जेधे चौक ते अलका टॉकीज चौक
बाजीराव रस्ता: पुरम चौक ते फुटका बुरुज चौक
छत्रपती शिवाजी महाराज रस्ता: गाडगीळ पुतळा ते जेधे चौक
शास्त्री रस्ता: सेनादत्त पोलीस चौकी ते अलका टॉकीज चौक
जंगली महाराज रस्ता: झाशी राणी चौक ते खंडोजीबाबा चौक
कर्वे रस्ता: नळस्टॉप ते खंडोजीबाबा चौक
फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता: खंडोजीबाबा चौक ते गुडलक चौक
याशिवाय खंडोजीबाबा चौक ते हॉटेल वैशाली यांना जोडणाऱ्या उपरस्त्यांच्या १०० मीटर परिसरातही वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
या सर्व रस्त्यांवरील नियमित वाहनतळ व्यवस्था मुख्य विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत तात्पुरती स्थगित राहणार आहे.
