सामाजिक कार्यासाठी मनोज छाजेड यांना ‘सूर्यदत्ता बन्सीरत्न मानव सेवा पुरस्कार’ प्रदान
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने योगदान देत समाजसेवेचा आदर्श निर्माण करणारे मनोज छाजेड यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल ‘सूर्यदत्ता बन्सीरत्न मानव सेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
गेल्या १९ वर्षांपासून सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करून आतापर्यंत सुमारे २५,००० रक्तपिशव्यांचे संकलन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मनोज छाजेड यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.
पुणे आणि परिसरातील गरजू रुग्णांना रक्ताची उपलब्धता करून देण्यासाठी या उपक्रमाचा मोठा हातभार लागला आहे.
पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
मुळशी येथील Serrano Farms परिसरात गेल्या १५ वर्षांपासून सुमारे १ लाख वृक्षांची लागवड करण्यात आली असून, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.
कोविड-१९ महामारीच्या कठीण काळात JITOच्या तीन कोविड केंद्रांच्या उभारणी व व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य त्यांनी केले.
संकटकाळात सामाजिक संस्थांसोबत समन्वय साधत गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करण्याचे कार्यही त्यांनी केले. मनोज छाजेड यांची JITO पुणेच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झाली असून, हा संपूर्ण पुणेकरांसाठी तसेच JITO परिवारासाठी अभिमानाचा क्षण मानला जात आहे.
त्यांच्या सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि समाजहिताच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या बहुआयामी सामाजिक योगदानाची दखल घेत मनोज छाजेड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार सोहळ्यात आचार्य प. पू. लोकेशमुनीजी म. सा., प. पू. रमणिकमुनीजी म. सा., साध्वी रत्न प. पू. हिमानीजी म. सा., सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पराग काळकर, प्रसिद्ध शास्त्रज्ञ अरविंद नातू, ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद आणि पद्मश्री डॉ. सोमा घोष यांची प्रमुख उपस्थिती होती.
सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक संजय बी. चोरडिया व सुषमा चोरडिया यांच्या पुढाकाराने पुण्यातील साधना सदन येथे हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
सामाजिक बांधिलकी, रक्तदान, पर्यावरण संवर्धन, आपत्तीच्या काळातील मदतकार्य आणि प्रभावी नेतृत्व अशा विविध क्षेत्रांत सातत्याने सुरू असलेल्या मनोज छाजेड यांच्या कार्याचा हा सन्मान असल्याचे आयोजकांनी नमूद केले.
