आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

फायनान्स कंपनीच्या शाखा व्यवस्थापक, रोखपालाने घातला गंडा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 7, 2026
Spread the love

पुणे : फायनान्स कंपनीमध्ये तारण ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोकड शाखा व्यवस्थापक व रोखपाल महिलेने संगनमत करून चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बिबवेवाडी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कंपनीच्या ऑडिट अहवालात हा प्रकार उघडकीस आला.

याबाबत मॅग फिनसर्व्ह लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक अनिल गणपतराव खलाटे (वय ५६, रा. जिजाई हाइट्स, आंबेगाव) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी शाखा व्यवस्थापक संजय सुभाष जगदाळे (वय ३५, रा. पिरॅमिड चौक, स्वरा हाइट्स, ता. फलटण, जि. सातारा) आणि रोखपाल हर्षदा निरंजन मोरे (वय ३२, रा. रासकर पॅलेस, शिंदे वसाहत, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मॅग फिनसर्व्ह लिमिटेडच्या बिबवेवाडी शाखेत १ एप्रिल २०२६ ते २७ एप्रिल २०२६ या कालावधीत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय जगदाळे हे मॅग फिनसर्व्ह कंपनीत शाखा व्यवस्थापक, तर हर्षदा मोरे या रोखपाल म्हणून काम करतात. कंपनीमध्ये आठ ग्राहकांनी तारण ठेवलेले सोने विश्वासाने कंपनीच्या ताब्यात दिले होते. हे सोने तारण पॅकेट लॉकरमध्ये ठेवणे, काढणे व हाताळणे, तसेच चावीची जबाबदारी या दोघांकडे होती.

या दोघांनी संगनमत करून गैरफायदा घेत १ लाख ६९ हजार रुपये किमतीचे १३ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच ४ लाख ३३ हजार ५१८ रुपयांची रोकड असा एकूण ६ लाख २ हजार ५१८ रुपयांचा अपहार केला. कंपनीचा विश्वासघात करून फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीच्या ऑडिटमध्ये हा प्रकार उघडकीस आला.

पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कोपनर तपास करीत आहेत.