आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सराफी पेढी चोरी प्रकरणात दिल्लीतून चोरट्याच्या साथीदाराला अटक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 22, 2026
Spread the love

पुणे : मुंढवा येथील आराध्या ज्वेलर्स या सराफी पेढीच्या भिंतीला छिद्र पाडून अडीच कोटी रुपयांचे सोने-चांदीचे दागिने चोरून पसार झालेल्या चोरट्याच्या साथीदाराला मांजरी पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. आरोपीकडून ३१ लाख रुपयांचे १३ किलो ७९२ ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.

कासीम मोहसीन शेख (वय ४१, रा. कुंचा सेठ, दरीबा कलान, चांदणी चौक, दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मांजरी-मुंढवा रस्त्यावरील अ‍ॅव्हेन्यू कॉम्प्लेक्स या इमारतीच्या तळमजल्यावरील सराफी पेढीच्या भिंतीला छिद्र पाडून २ कोटी ५६ लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लांबविण्याची घटना जुलै २०२६ मध्ये घडली होती. या सोसायटीतील रखवालदाराच्या खोलीतून सराफी पेढीच्या भिंतीला छिद्र पाडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला होता. दुकानातील २ कोटी ५५ लाख रुपयांचे सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोकड असा ऐवज चोरून नेला होता.

या प्रकरणी मांजरी पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने यापूर्वी चार चोरट्यांना अटक केली आहे. या गुन्ह्यात एकूण १३ आरोपी निष्पन्न झाले आहेत. पोलीस अंमलदार संदीप राठोड यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणातून एका चोरट्याच्या साथीदाराचे लोकेशन दिल्लीतील चांदणी चौक परिसरात असल्याचे समोर आले. त्यानंतर मांजरी पोलिसांचे पथक दिल्लीला गेले आणि त्यांनी कासीम शेख याला अटक केली.

कासीम शेख हा चोरट्यांचा नातेवाईक असून, दिल्लीतील चांदणी चौक परिसरात दागिने घडविण्याचे काम करतो. सराफी पेढीत चोरी केल्यानंतर कासीमचा नातेवाईक दिल्लीत आला होता. त्याने कासीमकडे १३ किलो चांदीचे दागिने ठेवण्यासाठी दिले होते. आरोपी पोलीस कोठडीत असताना पोलीस पथकाने दिल्लीला जाऊन त्याच्याकडून चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी ३१ लाख रुपयांचे १३ किलो ७९२ ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत केले.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल आणि सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम, पोलीस निरीक्षक इरफान नदाफ, पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस अंमलदार प्रदीप सोनवणे, संदीप राठोड, सचिन जाधव, निखील पवार, गणेश काकडे, प्रकाश बेरड, अशोक अंधारे, रवीकांत कचरे, चंद्रकांत रेजितवाड, नामदेव मारडकर, ज्ञानेश्वर चोरमले, माधव हिरवे, अश्पाक शेख, वैभव ओहोळ आणि अमोल जाधव यांनी केली आहे.