छत्रपती मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या ठेवीदारांना पोलिसांचे आवाहन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मुदत ठेवींवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून १ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी छत्रपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, गेवराईचे अध्यक्ष संतोष बसवंत भंडारी (रा. मिलेनियम पार्क, छत्रपती संभाजीनगर) यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
याबाबत डॉ. विजेंद्र उत्तमराव पाटील (वय ३७, रा. केशवनगर, मुंढवा) यांच्या फिर्यादीवरून हडपसर पोलीस ठाण्यात ७ एप्रिल २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. पाटील व इतर ३० जणांची १ कोटी १३ लाख ७४ हजार ४०० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. पोलिसांनी संतोष भंडारी याच्यासह त्याच्या प्रतिनिधींविरुद्ध ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमांतर्गत (एमपीआयडी) गुन्हा दाखल केला आहे.
मुदत ठेवींची मुदत संपल्यानंतरही ठेवीदारांना पैसे परत मिळत नव्हते. संतोष भंडारी याने ठेवीदारांची बैठक घेऊन २०२४ मध्ये पैसे टप्प्याटप्प्याने परत करण्याचे आश्वासन दिले होते.
परंतु, त्यानंतरही पैसे परत न केल्याने ठेवीदारांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. या गुन्ह्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
या प्रकरणातील ठेवीदारांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करावी. ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखेत हजर राहावे, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील यांनी केले आहे.
दीड वर्षांपासून संतोष भंडारी फरार – छत्रपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन संतोष भंडारी याच्याविरुद्ध बीड, गेवराई तसेच छत्रपती संभाजीनगर येथे विविध गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल होत असल्याचे समजल्यानंतर तो गेल्या दीड वर्षांपासून फरार आहे. छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांतील पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. पुण्यातील या गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत १२० ठेवीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यानुसार फसवणुकीची रक्कम ३ कोटी ४ लाख रुपये असल्याचे समोर आले आहे.
