आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पुणे विमानतळावर ४४ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 21, 2026
Spread the love

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने मोठी कारवाई करत बँकॉकहून आलेल्या भारतीय प्रवाशाकडून तब्बल ४४ लाख २७ हजार रुपयांचा १ किलो २६५ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या बँकॉक-पुणे विमानातील प्रवाशावर प्रगत प्रवासी प्रोफाइलिंग आणि चेक-इन बॅगेजच्या नियमित क्ष-किरण तपासणीच्या आधारे १९ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली. संबंधित प्रवाशाला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रवासी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाने बँकॉकहून पुण्यात दाखल झाला होता. प्रवाशांचे प्रगत प्रोफाइलिंग आणि चेक-इन बॅगेची एक्स-रे तपासणी सुरू असताना सीमाशुल्क अधिकाऱ्यांना त्याच्या सामानाबाबत संशय आला.

त्यानंतर बॅगेची कसून झडती घेण्यात आली. तपासणीदरम्यान काळ्या रंगाच्या ट्रॉली बॅगेच्या बाजूच्या अस्तरात विशेष गुप्त कप्पे तयार केल्याचे आढळून आले.

या कप्प्यांमध्ये हवाबंद आणि बहुस्तरीय प्लास्टिकच्या दोन पाकिटांत अमली पदार्थ लपविण्यात आले होते. पाकिटांमध्ये पिवळसर-हिरव्या रंगाचा वाळलेला वनस्पतीजन्य पदार्थ आढळला. प्राथमिक चाचणीत तो गांजा असल्याचे स्पष्ट झाले.

सीमाशुल्क विभागाने एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत संपूर्ण साठा जप्त केला असून, संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. अवैध पुरवठा साखळीतील मागील व पुढील दुव्यांचा छडा लावण्यासाठी तपास सुरू आहे.