आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बाणेर परिसरात लुटमार करणारे गजाआड

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 21, 2026
Spread the love

पुणे : बाणेर परिसरात पहाटे घरी जाणाऱ्या एका तरुणाला अडवून त्याच्याकडील सोन्याचे ब्रेसलेट, सोनसाखळी तसेच रोकड असा ऐवज लुटणाऱ्या चौघांना बाणेर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.

पवन रामदास पारगे (वय १८, रा. धायरी फाटा, सिंहगड रस्ता), साहिल बाळासाहेब मरगळे (वय १९, रा. कोल्हेवाडी, खडकवासला, सिंहगड रस्ता), विशाल बाळासाहेब झोडगे (वय १८, रा. कदमवाडा, धायरी गाव), आदित्य हरिश्चंद्र कोळकर (वय १८, रा. शिंदे चाळ, गारमाळ, धायरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लब रस्त्याने १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री तक्रारदार जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडवले. त्यांना धमकावून हातातील सोन्याचे ब्रेसलेट आणि सोनसाखळी काढून घेतली. तसेच त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने १८ हजार ९९९ रुपये घेतले. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले. याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. लुटमार करणारे चोरटे धायरी भागातील असल्याची माहिती तपासात मिळाली. पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून रोकड जप्त करण्यात आली आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, सहायक पोलीस आयुक्त ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक विजय खिल्लारे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश रायकर, गणेश गायकवाड, बाबा आहेर, किसन शिंगे, संदेश निकाळजे, संजय दहिभाते, शरद राऊत, अतुल इंगळे, प्रदीप खरात, गजानन अवातिरक, स्वप्नील मराठे, गणेश भोईने, समीर पवार यांनी केली आहे.