पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून घेऊन आत्महत्या
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : औंध रोडवरील राहत्या घरी पोलीस उपनिरीक्षकाने गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचा प्रकार आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास समोर आला आहे.
निलेश भाऊसाहेब पाटील (वय ५५, रा. नागरस रोड, औंध) असे या श्रेणी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. सध्या त्यांची नेमणूक विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. निलेश पाटील हे पुणे पोलीस दलात पोलीस अंमलदार म्हणून भरती झाले होते. अनेक वर्षे सेवा केल्यानंतर त्यांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली होती.
निलेश पाटील यांना आरोग्याच्या काही समस्या होत्या. गणेशोत्सवापूर्वी ते एक ते दोन महिने सुट्टीवर होते. गणपती बंदोबस्तासाठी ते कामावर रुजू झाले होते.
उच्च न्यायालयातील कामासाठी ते आज मुंबईला जाणार होते. परंतु, ते आज गेले नाहीत. नागरस रोड येथील राहत्या घरी ते होते. घरात त्यांचा मुलगा होता. गोळीचा आवाज ऐकून मुलगा बाहेर आला, तेव्हा सोफ्यावर निलेश पाटील हे रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले त्याने पाहिले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले; परंतु, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. चतु:शृंगी पोलीस तपास करीत आहेत.
