राज्यपालांच्या हस्ते उद्योजक अभय संचेती यांचा सन्मान
‘राजस्थानी उद्योजक यशोगाथा’मध्ये उद्योगासह समाजसेवेतील योगदानाचा गौरव
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कष्ट, सचोटी आणि ग्राहकांचा विश्वास या मूल्यांच्या बळावर उद्योगविश्वात स्वतंत्र ओळख निर्माण करतानाच सामाजिक क्षेत्रात सातत्याने योगदान देणारे उद्योजक अभय बनसीलाल संचेती यांचा राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘राजस्थानी उद्योजक यशोगाथा’ कॉफी टेबल बुक प्रकाशन सोहळ्यात संचेती यांच्या उद्योग आणि समाजसेवेतील कार्याचा गौरव करण्यात आला.
या वेळी राजस्थानच्या माहिती व प्रसारण विभागाच्या प्रतिनिधी ऋतू सोधी, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस यांच्यासह उद्योग, व्यापार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल बागडे म्हणाले, ‘‘राजस्थानमधून देशाच्या विविध भागांत गेलेल्या समाजाने नोकरीपेक्षा उद्योग आणि व्यवसायाला प्राधान्य दिले.
छोट्या व्यवसायापासून मोठ्या उद्योगसमूहांपर्यंत स्वतःचे विश्व निर्माण करताना राजस्थानी समाजाने समाजसेवा, दानशूरता आणि संस्कारांची परंपराही जपली. देशाच्या उद्योगविश्वाच्या उभारणीत या समाजाचे योगदान उल्लेखनीय आहे.’’
राजस्थानी समाजाच्या दानशूरतेचा उल्लेख करताना त्यांनी ‘भामाशाह’च्या परंपरेचे उदाहरण दिले. उद्योग आणि आर्थिक प्रगतीबरोबर शिक्षण, संस्कार आणि सामाजिक जाणीव महत्त्वाची असल्याचे सांगत बागडे म्हणाले, ‘‘जन्म आणि मृत्यूदरम्यानचा जीवनाचा कोरा कागद प्रत्येकाने आपल्या कर्माने भरायचा असतो. ‘यशोगाथा’मधील उद्योजकांनी या कागदावर उद्योगासोबत समाजसेवेची प्रेरणादायी कहाणी लिहिली आहे.’’
शेतकरी कुटुंबातून उद्योगविश्वात – अभय संचेती : सासवडजवळील भिवरी येथील मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात अभय संचेती यांचा जन्म झाला. जिरायती शेती आणि किराणा दुकानावर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असताना संचेती कुटुंबाने पुढे पुण्यात स्थलांतर केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही वडील बनसीलाल संचेती यांनी मुलांच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. लहानपणापासूनच व्यापाराची आवड असलेल्या अभय संचेती यांनी कोल्ड्रिंक, राखी आणि दिवाळीत फटाक्यांचे छोटे स्टॉल लावत व्यवसायातील प्राथमिक धडे घेतले. पुढे वडिलांनी १९७८ मध्ये सुरू केलेल्या *‘संचेती ट्रेडर्स’*मध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली. गुणवत्ता, योग्य दर आणि प्रामाणिक व्यवहार या तत्त्वांचा वारसा जपत त्यांनी व्यवसाय विस्तारला. मार्केट यार्डमध्ये पुढे ‘बनसीलाल लखीचंद संचेती’ या व्यापारपेढीच्या माध्यमातून गहू, ज्वारी, हरभरा, बाजरी आणि तांदळाच्या व्यवसायाला विस्तार दिला. १९९३ पासून दिल्ली आणि हरियाणातील बासमती तांदळाच्या व्यापारात प्रवेश करत महाराष्ट्राबाहेरही पेढीची विश्वासार्ह ओळख निर्माण केली.
अभय संचेती यांचे सामाजिक कार्यात मोठे कार्य
- जैन समाजातील विविध संस्थांमध्ये सक्रिय नेतृत्व व संघटनात्मक कार्य
- वधू-वर परिचय संमेलने आणि सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन
- रक्तदान, महिला आरोग्य तपासणी आणि मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन
- भूकंप, पूर आणि दुष्काळग्रस्तांना जीवनावश्यक मदत व पाण्याच्या टँकरची व्यवस्था
- गोसेवा आणि पशुसंवर्धनासाठी गौशाळेची उभारणी
- ‘स्व. इंदुमती बनसीलाल संचेती ट्रस्ट’च्या माध्यमातून संस्कार, सेवा आणि जनकल्याणाचे सातत्यपूर्ण उपक्रम
‘‘ग्राहकांचा विश्वास, आई-वडिलांचे संस्कार आणि समाजाचे ऋण या तीन गोष्टी माझ्या आयुष्याचे आधारस्तंभ आहेत. प्रामाणिकपणा, गुणवत्ता आणि सेवाभाव जपत समाजासाठी काहीतरी सकारात्मक निर्माण करणे, हीच माझी खरी संपत्ती आहे. पुढील पिढीनेही उद्योगासोबत सामाजिक जबाबदारी स्वीकारून मूल्याधिष्ठित जीवन जगावे, हीच अपेक्षा आहे.’’ – अभय संचेती, मे. बनसीलाल लखीचंद संचेती
