पोलिसांना ६ वर्षे गुंगारा देणारा गजाआड
गुन्हे शाखेच्या युनिट ३ ची कारवाई : वडगाव बुद्रुक परिसरात केले जेरबंद
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : टोळक्याने तिघांवर हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा करून गेली ६ वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने वडगाव परिसरात पकडले.
सुधीर बुद्धीराम विश्वकर्मा (वय ३१, रा. टेल्को कॉलनी, जांभुळवाडी रस्ता, आंबेगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
सुजित व्यंकट धाकडे (वय २३, रा. दत्तनगर, कात्रज) व त्यांचे मित्र सोहेल आसंगी, आदित्य कांबळे, किरण माने हे नर्हे येथील हॉटेल मैत्री कट्टा येथे १३ मार्च २०२० रोजी दुपारी साडेतीन वाजता जेवणासाठी गेले होते.
पूर्वी सोहेल आसंगी याने मारहाण केल्याच्या कारणावरून अक्षय शिंदे, दीपक वैद्य, सुधीर विश्वकर्मा, दीपक लाड, शुभम जांबळे, सनी मोरे (सर्व रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर, कात्रज) यांनी चौघांना हाताने, कोयत्याने व विटांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले होते.
याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा या सर्वांवर दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून सुधीर विश्वकर्मा हा फरार होता.
गुन्हे शाखेच्या युनिट ३ मधील पोलीस अंमलदार पांडुरंग शिंदे आणि तुषार किंद्रे हे सिंहगड रोड परिसरात गस्त घालत होते. विश्वकर्मा हा वडगाव बुद्रुक भागात आला असल्याची माहिती शिंदे आणि किंद्रे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पंढरीनाथ शिंदे, किशोर शिंदे, तुषार किंद्रे, पुरुषोत्तम गुन्ला आणि आशिष राठोड यांनी केली.
