तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न
लक्ष्मीनगर पोलिसांनी गुंडाला केली अटक : मोबाईल चोरल्याच्या संशयावरून खुनाचा प्रयत्न
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : ज्या घरात पेंटिंगचे काम करायचे होते, त्या घरातील लोक उठले आहेत का, हे पाहण्यासाठी पहाटे आलेल्या तरुणाला मोबाईल चोरल्याच्या संशयावरून लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाई म्हणवून घेणाऱ्याला लक्ष्मीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
अमन आनंद घलोत (वय ३१, रा. रामनगर, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत संदिप आनंद सोनवणे (वय ४३, रा. जयजवाननगर, येरवडा) यांनी लक्ष्मीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना येरवड्यातील रामनगर येथील गेहलोत चौकात ६ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वासहा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदिप सोनवणे हे पेंटिंगचे काम करतात. रामनगर येथील एका घरात पेंटिंगचे काम करायचे होते. त्यासाठी त्या घरातील लोक उठले आहेत की नाही, हे पाहण्यासाठी ते पहाटे गेले होते. त्यावेळी अमन घलोत याला सोनवणे हे मोबाईल चोरी करून आले असल्याचा संशय आला. त्याने संदिप सोनवणे यांना रस्त्यात अडवून, ‘मेरा मोबाईल किधर है, तू ही चुरा के भागा ना साले,’ असे म्हणून शिवीगाळ केली. ‘मेरा मोबाईल मेरे को दे, नहीं तो आज तुझे ऊपर भेज दूंगा,’ असे म्हणून त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अमन याने संदिप सोनवणे यांच्या डोक्यात, खांद्यावर तसेच दोन्ही हातांवर लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले.
त्यांचा आरडाओरडा ऐकून लोक जमा झाले. तेव्हा अमन याने लोखंडी रॉड हवेत फिरवून, ‘मैं इधर का भाई हूँ, कोई साला बीच में आया तो उसे भी ऊपर भेज दूंगा,’ असे मोठमोठ्याने ओरडून दहशत निर्माण केली. या घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीनगर पोलिसांनी अमन घलोत याचा शोध घेऊन त्याला अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे तपास करीत आहेत.
