आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाला मारहाण

maharashtra jain warta • Maharashtra News Networks • October 8, 2026
Spread the love

पुणे : आजीबरोबर औषध घेण्यासाठी जाणाऱ्या तरुणाला अडवून सराईत गुन्हेगाराने पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने गुन्हेगाराने त्याला मारहाण करून घराच्या खिडकीची काच फोडून दहशत निर्माण केली. खडकी पोलिसांनी या सराईत गुन्हेगाराला अटक केली असून, त्याच्या साथीदार असलेल्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

सिद्धार्थ योगेश चव्हाण (वय २५, रा. बोपोडी) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. सिद्धार्थ चव्हाण याच्याविरुद्ध मारामारी करणे, खंडणी उकळणे असे सहा गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. आकाश महादेव अहीवळे (वय २५, रा. पवळे गिरणीजवळ, बोपोडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ६ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजता फिर्यादी यांच्या बोपोडीतील घराजवळ घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश अहीवळे व त्यांची आजी तानुबाई तुकाराम पारसे हे मोटारसायकलवरून औषध आणण्यासाठी गोविंद मेडिकल येथे जात होते. यावेळी सिद्धार्थ चव्हाण त्यांच्याजवळ आला. त्याने आकाश यांच्याकडे हजार रुपये मागितले. तेव्हा आकाश यांनी, ‘तुला मागे दोन वेळा पाचशे रुपये दिले होते. पण आता माझी आजी माझ्याबरोबर आहे. तू मला जाऊ दे,’ असे म्हणाले.

त्यावर सिद्धार्थ चव्हाण याने ‘का रे, तू जास्त शहाणा झाला का? मी इथला भाई आहे, तुला माहित नाही का?’ असे म्हणून त्यांच्या खिशात हात घालू लागला. आकाश यांनी त्याचा हात झटकला. त्यावर त्याने आकाश यांच्या कानाखाली दोनदा चापट मारली. हातातील कडे काढून त्याने आकाश यांच्या डोळ्यावर व कानाखाली मारून त्यांना जखमी केले.

आकाश यांचे काका त्यांना सोडविण्यासाठी आले असताना अल्पवयीन मुलाने त्यांना ठोसा मारून जखमी केले. सिद्धार्थ चव्हाण याने लोखंडी हत्याराने घराच्या खिडकीची काच फोडून ते हवेत फिरवून जमलेल्या लोकांकडे बघत, ‘तुमच्या सर्वांची आकाशसारखी अवस्था करून टाकीन,’ असे म्हणून दहशत पसरवली. त्यामुळे लोक निघून गेले.

या घटनेची माहिती मिळताच खडकी पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. घटनेनंतर दोन तासांतच सिद्धार्थ चव्हाण याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक दत्ता गुळींग तपास करीत आहेत.