नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील वाहतुकीत बदल
भवानी माता मंदिर, चतु:शृंगी मंदिर, जोगेश्वरी मंदिर : काही रस्ते बंद
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध मंदिरांच्या परिसरात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, श्री चतु:शृंगी मंदिर, भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर आणि सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. या भागातील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
तांबडी जोगेश्वरी मंदिर – नवरात्रोत्सवादरम्यान बुधवार पेठेतील श्री तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या परिसरात भाविकांची गर्दी होते. रविवारपासून (११ ऑक्टोबर) अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकापर्यंतचा (हुतात्मा चौक) रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौकादरम्यान एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे. लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक ते श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरादरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. सकाळ कार्यालयापासून श्री तांबडी जोगेश्वरी मंदिराकडे जाणारा रस्ता अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता अन्य वाहनांसाठी बंद राहणार आहे.
पर्यायी मार्ग – वाहनचालकांना अप्पा बळवंत चौक आणि गाडीतळ पुतळा येथून शिवाजी रस्त्याने इच्छितस्थळी जाता येईल. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, शनिवार पेठेतील श्री अष्टभुजा मंदिर परिसरातही वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने नदीपात्रातील रस्ता किंवा मंडईतील वाहनतळावर लावावीत.
भवानी माता मंदिर – रामोशी गेट चौक ते जुना मोटार स्टँड या दरम्यान भवानी माता मंदिरासमोरील महात्मा फुले रस्ता अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी दोन्ही बाजूंनी बंद करण्यात येणार आहे. नेहरू रस्ता ते श्री भवानी माता मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग – संत कबीर चौकाच्या बाजूने येऊन रामोशी गेट चौकातून भवानी माता रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनी ए. डी. कॅम्प चौकातून डावीकडे वळून भारत सिनेमा, पदमजी चौकी चौक येथून उजवीकडे वळावे. तेथून जुना मोटार स्टँडपर्यंत येऊन इच्छितस्थळी जावे.
ढोले पाटील चौकाच्या बाजूने येऊन रामोशी गेट चौकासमोरून भवानी माता मंदिर रस्त्याने जुना मोटार स्टँडकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी भगवान बाहुबली चौकातून जुना मोटार स्टँडकडे जावे. यासाठी मा. माणिकदास महाराज चौक ते भगवान बाहुबली चौकादरम्यानच्या जाधव रस्त्यावरील एकेरी मार्गावरील वाहतूक निर्बंध नवरात्रोत्सवाच्या कालावधीपुरते शिथिल करण्यात येत आहेत.
रामोशी गेट येथून जाणाऱ्या पीएमपी बसची वाहतूक सेव्हन लव्हज चौकातून डावीकडे वळून गोळीबार मैदान चौकातून पुन्हा डावीकडे वळून खानेमारुती चौकातून सुरू राहील.
चतु:शृंगी मंदिर – सेनापती बापट रस्त्यावरील श्री चतु:शृंगी मंदिर परिसरात गर्दी झाल्यास या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. या भागात गर्दी वाढल्यास सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक वेताळबाबा चौकमार्गे दीप बंगला चौक आणि ओम सुपर मार्केटमार्गे वळविण्यात येणार आहे.
कॉसमॉस जंक्शनकडून सेनापती बापट रस्त्यावर येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने पॉलिटेक्निक मैदानावरील पार्किंगमध्ये नेण्यासाठी शिवाजी हाउसिंग चौकातून डावीकडे वळून कै. सावंत चौकातून फिरोदिया पथमार्गे जावे.
वीर चाफेकर चौकाकडून चतु:शृंगी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या वाहनचालकांनी आपली वाहने सूर्यमुखी दत्त मंदिर चौकातून डावीकडे वळवून थोरात चौकातून दीप बंगला चौकमार्गे न्यावीत. तसेच, गणेशखिंड रस्त्यावरील संगण्णा धोत्रे पथ आणि खाऊ गल्लीमार्गे पॉलिटेक्निक पार्किंग गेटकडे जावे, अशा सूचना पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिल्या आहेत.
महालक्ष्मी मंदिर, सारसबाग – श्रीसूक्त पठणानिमित्त सोमवारी (१२ ऑक्टोबर) सकाळी पाच ते सात या वेळेत सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. स्वारगेटकडून सारसबागमार्गे स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. मित्रमंडळ चौकाकडून पूरम चौकाकडे येणारा मार्गही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
मित्रमंडळ चौकातून येणाऱ्या वाहनचालकांनी सावरकर चौकातून सिंहगड रस्त्यामार्गे इच्छितस्थळी जावे. सिंहगड रस्त्याने सावरकर चौकात येणाऱ्या वाहनचालकांनी लक्ष्मीनारायण चौकातून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
