एमपीएससी आंदोलनस्थळी विनापरवाना उडवला ड्रोन
युयुवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरेसह ५ जणांवर गुन्हा दाखल : विश्रामबाग पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी विनापरवाना ड्रोन उडविल्याप्रकरणी पोलिसांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शिवराज मोरे हे ५ ऑक्टोबर रोजी आंदोलनस्थळी आले असताना ड्रोन उडविण्याचा हा प्रकार घडला होता. याप्रकरणी १० ऑक्टोबर रोजी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ड्रोनचालक दिगंबर भारत खारे (रा. तुकाराम हाइट्स, तुकारामनगर, आंबेगाव), शिवराज मोरे, प्रमोद पाटील, ऋषिकेश गांगुर्डे आणि अक्षय कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार युवराज टेळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज टेळे हे विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या गोपनीय शाखेत नेमणुकीस आहेत. एस. एम. जोशी पुलाजवळ एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनस्थळी गोपनीय माहिती मिळविण्यासाठी टेळे उपस्थित होते. ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आंदोलनस्थळी झालेल्या गर्दीवर हवेत एक ड्रोन उडताना दिसला.
टेळे यांनी त्याचा पाठलाग करून शोध घेतला असता, आंदोलनाच्या मागील बाजूस जनरेटरजवळ एक व्यक्ती रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने ड्रोन हाताळत असल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक कुदळे यांनी ड्रोनचालकाकडे विचारणा केली. त्याने आपले नाव दिगंबर भारत खारे असून, फोटोग्राफीचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले. तसेच, आंदोलनात सहभागी असलेल्या प्रमोद पाटील, शिवराज मोरे, ऋषिकेश गांगुर्डे आणि अक्षय कांबळे यांच्या सांगण्यावरून ड्रोन उडवून चित्रीकरण करत असल्याचे त्याने सांगितले. यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचेही त्याने कबूल केले.
पोलिसांनी त्याला ड्रोन खाली घेण्यास सांगितले. यावेळी ४० हजार रुपये किमतीचा ड्रोन आणि १० हजार रुपये किमतीचा जुना ड्रोन रिमोट कंट्रोलर, असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दिगंबर खारे याला ड्रोन उडवून चित्रीकरण करण्याची अधिकृत परवानगी सादर करण्याबाबत वारंवार सूचित करूनही त्याने कोणतीही कागदपत्रे किंवा परवानगीपत्र सादर केले नाही. त्यामुळे पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शोभा तेली या प्रकरणाचा तपास करत आहेत.
