आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तरुणाच्या मानेवर वार करून खुनाचा प्रयत्न

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 10, 2026
Spread the love

पुणे : वडील आणि मुलामधील वादावादीच्या आवाजाचा त्रास होत असल्याचे सांगत एका तरुणाने मुलाला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर, मारहाणीची तक्रार करण्यासाठी जात असल्याचे पाहून या तरुणाच्या मानेवर वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पर्वती पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे.

याबाबत निलेश चंद्रकांत धुमक (वय ३०, रा. जनता वसाहत, पर्वती) यांनी पर्वती पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी वैभव गणेश वेदपाठक (वय १९, रा. जनता वसाहत, पर्वती) याला अटक केली आहे.

ही घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जनता वसाहतीतील सार्वजनिक शौचालयाजवळ घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदपाठक आणि धुमक हे शेजारी राहतात.

शुक्रवारी (९ ऑक्टोबर) दुपारी अडीचच्या सुमारास निलेश घरी जेवण करत होता. त्या वेळी त्याचा वडिलांशी वाद झाला. दोघेही एकमेकांना मोठ्या आवाजात शिवीगाळ करत असताना शेजारी राहणारा वैभव तेथे आला.

तुमच्या भांडणाच्या आवाजाचा त्रास होतो, असे त्याने सांगितले. त्यानंतर वैभवने निलेशला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर निलेश पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी निघाला. त्यावेळी वैभव त्याच्या मागे आला.

‘माझी तक्रार पोलिसांकडे करतो का? तुझा जीव घेतो,’ असे म्हणत त्याने हातातील लोखंडी हत्याराने निलेशच्या उजव्या कानाच्या पाठीमागील बाजूस आणि मानेवर वार करून त्याला गंभीर जखमी केले.

त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पर्वती पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून वैभव वेदपाठक याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खिलारी तपास करत आहेत.