आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बँकेचे कर्ज न फेडता २५ लाखांची फसवणूक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 12, 2026
Spread the love

पुणे : हायवा ट्रक विकत घेताना त्यावरील २२ लाख रुपयांचे कर्ज फेडण्याचे आश्वासन दिले. मात्र, हे कर्ज न फेडता हायवा ट्रक परस्पर दुसऱ्याला विकून २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत गजेंद्र गोकुळसिंग परदेशी (वय ४१, रा. परदेशी मळा, फुरसुंगी) यांनी फुरसुंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी बापू गेनूभाऊ गायकवाड (वय ४३, रा. सिद्धार्थनगर, लोणीकंद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मे २०२५ पासून आतापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजेंद्र परदेशी यांच्या मालकीचा टाटा हायवा ट्रक होता. हे वाहन खरेदी करण्याची तयारी बापू गायकवाड यांनी दर्शवली. वाहनावरील येस बँकेचे २२ लाख रुपयांचे कर्ज फेडून फिर्यादी यांना ३ लाख रुपये देण्याचे, अशा प्रकारे एकूण २५ लाख रुपयांत वाहन खरेदी करण्याचे ठरले. त्यानुसार, गायकवाड यांनी फिर्यादी यांना ३ लाख रुपये दिले. बँकेचे २२ लाख रुपयांचे कर्ज आठवड्याभरात फेडतो, असे सांगून ते वाहन घेऊन गेले.

त्यानंतर बापू गायकवाड यांनी बँकेचे कर्ज न फेडता परदेशी यांच्या मालकीचे वाहन स्वतःच्या ताब्यात ठेवले आणि ते परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विकले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.