सायबर फसवणुकीतील दुबईतील गुन्हेगार जेरबंद
पिंपरी-चिंचवड सायबर सेलची कामगिरी : चिनी सायबर चोरट्यांशी संधान बांधून करत होता सायबर फसवणूक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : चिनी सायबर चोरट्यांशी संगनमत करून दुबईत बसून साथीदारांच्या मदतीने लोकांची फसवणूक करणाऱ्या चोरट्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी दुबईहून डिपोर्ट केल्यानंतर मुंबई विमानतळावर अटक केली.
सुमंत उर्फ नानू रवींद्र दसरे (वय २६, रा. निगडी प्राधिकरण) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात सायबर फसवणुकीच्या तक्रारी वाढत आहेत. तपासादरम्यान आरोपी परदेशात राहून वेगवेगळ्या बँक खात्यांची माहिती मिळवून सायबर गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले.
सायबर गुन्ह्यांसाठी बँक अकाउंट पुरवणाऱ्या टोळीचा शोध घेत असताना सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांना माहिती मिळाली की, तुषार अमराराम चौधरी (वय २९, रा. साने वस्ती, चिखली) हा बँक अकाउंट उघडून त्यावर साथीदारांसह सायबर गुन्ह्यांतील रक्कम स्वीकारत असून, ती रोख स्वरूपात काढत आहे.
याबाबत माहिती घेऊन तुषार चौधरी याचा शोध घेत असताना, त्याने त्याचा साथीदार आदर्श संतोष वाघमारे (वय २७, रा. आकुर्डी) याच्या मदतीने दुबईतील साथीदार सुमंत दसरे याच्यासाठी सायबर गुन्ह्यांतील पैसे स्वीकारून ते काढून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडे तपास केला असता, ते वेगवेगळ्या बँकांमध्ये अकाउंट उघडून त्यांची माहिती सुमंत याला देत होते. त्यानंतर तो त्या खात्यांवर सायबर फसवणुकीतील पैसे पाठवत होता. हे पैसे तुषार आणि आदर्श रोख स्वरूपात किंवा चेकद्वारे काढून घेत असत. त्यातून आपले कमिशन ठेवून उर्वरित रक्कम सीडीएममार्फत सुमंत याने दिलेल्या बँक खात्यांवर दुबईला पाठवत असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर सुमंत दसरे हा दुबई येथे चिनी सायबर गुन्हेगारांसोबत मिळून सायबर गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरुद्ध हैदराबाद, तेलंगणा आणि काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
सुमंत दसरे हा दुबई येथून सायबर गुन्ह्यांचे रॅकेट चालवत असल्याने प्रवीण स्वामी यांनी त्याची माहिती काढली. त्याआधारे पोलीस उपायुक्तांनी त्याच्याविरुद्ध एलओसी (लुक आऊट नोटीस) जारी केली. या एलओसीच्या आधारे इंटरपोलच्या माध्यमातून गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुमंत दसरे याला दुबई येथे ताब्यात घेऊन डिपोर्ट करण्यात आले. मुंबई विमानतळावर तो उतरल्यावर सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी आणि त्यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन पुण्यात आणले आणि अटक केली. या गुन्ह्यात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, दिगंबर गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, वैभव पाटील, पोलीस निरीक्षक रोहित डोळस, सागर पोमण, प्रकाश कातकडे, विद्या पाटील, पोलीस अंमलदार दीपक भोसले, नितेश बिचेवर, देवा वाघमारे, अतुल लोखंडे, स्वप्नील खणसे, श्रीकांत कबुले, माधव आरोटे, सोपान बोधवाड आणि दिपाली चव्हाण यांनी केली आहे.
निगडी प्राधिकरण ते दुबईतील सायबर गुन्हेगार – सुमंत दसरे याच्याकडे पोलिसांनी केलेल्या तपासात तो निगडी प्राधिकरणातील सामान्य तरुण ते दुबईतील सायबर गुन्हेगार कसा बनला, याचा लेखाजोखा समोर आला आहे. तो सुरुवातीला सहा हजार दिनार पगारावर शेअर ट्रेडिंग आणि टास्क फ्रॉडसाठी कॉलिंग व मेसेजिंगचे काम करत होता. या कामामध्ये पीडितांकडून मिळालेल्या रकमेपैकी चार टक्के रक्कम त्याला कमिशन म्हणून मिळत होती. त्यानंतर त्याने चिनी आरोपींकडून वेगवेगळी आंतरराष्ट्रीय कार्ड्स घेऊन ती विविध मॉल आणि इतर ठिकाणी स्वाइप करून महागड्या वस्तू खरेदी करण्यास सुरुवात केली. या वस्तू चिनी आरोपींना देऊन त्यांच्याकडून तो कमिशन मिळवत असे. यादरम्यान त्याला सायबर गुन्ह्यांची संपूर्ण माहिती समजली. त्यानंतर त्याने चिनी आरोपींसोबत भागीदारीत सायबर गुन्ह्यांचे काम सुरू केले. त्यामधून त्याला २० टक्के रक्कम मिळत असे. या कामासाठी तुषार आणि आदर्श यांनी १५० पेक्षा जास्त बँक खाती मिळवून त्यावर सायबर फसवणुकीची रक्कम स्वीकारली आहे. या माध्यमातून त्याने आतापर्यंत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे कमावल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
