आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

विमान हवेत असताना आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • November 3, 2026
Spread the love

पुणे : इंडिगोचे दिल्ली ते पुणे हे विमान हवेत असताना एका प्रवाशाने अचानक आपत्कालीन दरवाजा उघडण्यासाठी असलेले लिव्हर उघडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विमानातील सेन्सर वाजू लागल्याने विमानात एकच घबराट निर्माण झाली. विमानतळ पोलिसांनी या प्रवाशावर गुन्हा दाखल केला आहे.

गौरव सत्येंद्र रौतेला (वय ३३, रा. आनंद पार्क, तारादत्त पूर्व सोसायटी, सासवड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे.

याबाबत इंडिगो कंपनीच्या सुरक्षा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक ओंकार विनोद कुलकर्णी (वय २८, रा. हिंजवडी) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

ही घटना २ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास दिल्ली ते पुणे हे विमान हवेत असताना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव रौतेला हे एका खासगी कंपनीत नोकरी करतात.

ते इंडिगोच्या विमानातून दिल्लीहून पुण्याला येत होते. विमानाने दिल्ली विमानतळावरून उड्डाण घेतले. त्यानंतर काही वेळातच विमानातील सेन्सर वाजू लागले.

या आवाजामुळे विमानातील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. विमानातील वैमानिक आणि इतर अटेंडंट यांनी तपासणी केली. त्यावेळी १९ बी सीटवरील प्रवासी विमानातील आपत्कालीन दरवाजा उघडण्यासाठी असलेल्या लिव्हरवरील कव्हर उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. त्यामुळे विमानातील इतर प्रवाशांनी त्याला रोखले.

त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने ती खिडकी असावी असे समजून उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. मध्यरात्री पावणे एक वाजता विमान हवेत असताना हा प्रकार घडला.

त्यानंतर साधारण अडीच वाजता विमान पुणे विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. त्यानंतर गौरव रौतेला याला विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

इंडिगोच्या सुरक्षा विभागाने याबाबत तक्रार दिली आहे. विमानातील इतर प्रवाशांच्या जीविताला आणि वैयक्तिक सुरक्षिततेला धोका निर्माण होईल, अशी कृती केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

विमानतळ पोलिसांनी गौरव रौतेला याला नोटीस बजावली आहे. सहायक पोलीस निरीक्षक अशोक शिरसाट तपास करीत आहेत.