१६ वर्षांच्या युवकावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न
भिडे पुलाजवळील घटना : दहावीच्या परीक्षेवेळी झालेली भांडणे मिटविण्यासाठी बोलावले, ६ अल्पवयीन मुले ताब्यात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मार्च महिन्यात दहावीची परीक्षा सुरू असताना झालेल्या भांडणाची पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. ही भांडणे मिटविण्यासाठी भिडे पुलाजवळ बोलावून १६ वर्षांच्या युवकावर कोयत्याने सपासप वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. डेक्कन पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून, सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
या घटनेत शौर्य विशाल मोहिते (वय १६, रा. घोरपडी पेठ) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. ही घटना २ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता भिडे पुलाजवळ घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शौर्य मोहिते हा सध्या गरवारे कॉलेजमध्ये अकरावीत शिकत आहे. तो दहावीत असताना त्याच्या परीक्षेचे केंद्र सिमला ऑफिससमोरील भारत इंग्लिश स्कूल येथे होते.
परीक्षा सुरू असताना त्याच्या शाळेतील मित्रांबरोबर किरकोळ कारणावरून त्याचे वाद झाले होते. त्यावेळी त्यांनी शौर्यला शाळेच्या आवारात मारहाण केली होती.
त्याचा व्हिडिओही बनवला होता. शाळेबाहेर आल्यावरही त्याला मारहाण करणारी मुले त्याचा पाठलाग करू लागली. तेव्हा तो भीतीने शिवाजीनगर पोलीस चौकीत गेला.
तेथे फोन केल्यानंतर त्याचे वडील आले. त्याला मारहाण करणाऱ्या मुलांचे आई-वडीलही आले होते. त्यावेळी त्यांच्यात आपापसांत समझोता होऊन भांडण मिटले.
पोलिसांनी मारहाण करणाऱ्या मुलांना समज देऊन सोडून दिले होते. याचा राग त्या मुलांनी मनात धरला होता. त्यानंतर १५ ऑगस्ट २०२६ रोजी शिवाजीनगर येथील वृद्धेश्वर घाट येथे मागील भांडणे मिटविण्यासाठी ते आले असता त्यांच्यात पुन्हा भांडण झाले.
२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी शौर्य हा मित्रांबरोबर फिरायला गेला होता. त्याला भिडे पुलाजवळ भेटण्यासाठी बोलावण्यात आले. तो मित्राबरोबर भिडे पुलाजवळ गेला.
तेव्हा भारत इंग्लिश स्कूलमध्ये त्याला मारहाण करणाऱ्या मुलांपैकी एकाने, ‘तू आमची नावे पोलिसांना का सांगितली?’ असे म्हणत शिवीगाळ केली आणि कमरेला लावलेला कोयता काढला. त्याने शौर्यच्या डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला.
शौर्यने हा वार चुकवून पळण्यास सुरुवात केली. त्याचे मित्रही आरडाओरडा करत पळू लागले. पळत असताना शौर्य खाली पडला. तेव्हा त्या सहा जणांनी त्याला गाठले.
त्यांच्याकडील कोयता व धारदार शस्त्रांनी त्याच्या डोक्यावर वार करण्यास सुरुवात केली. शौर्यने हात आडवा घातला असता त्याच्या हाताच्या पोटरीवर व बोटांवर वार झाल्याने गंभीर दुखापत झाली.
त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस व मध्यभागी कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. लोक जमा झाल्याने हल्लेखोर पळून गेले.
शौर्यच्या मित्रांनी त्याला पूना हॉस्पिटलमध्ये नेले. त्यानंतर त्याला अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डेक्कन पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
डेक्कन पोलिसांनी सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, पोलीस निरीक्षक रणजितसिंग परदेशी तपास करीत आहेत.
