‘गोपी’ साबणाच्या नावाखाली बनावट साबणांची विक्री
पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांची कारवाई : ३.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : नामांकित ‘गोपी’ साबणाच्या नावाचा आणि ट्रेडमार्कचा कथित गैरवापर करून बनावट साबणांची विक्री होत असल्याच्या तक्रारीनंतर पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे पोलिसांनी कारवाई केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये या प्रकरणात ३ लाख ५३ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुण्यातील दोन व्यावसायिकांच्या दुकानांवरही छापे टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
‘गोपी’ साबणाचे पुणे जिल्ह्यात गेल्या ४० वर्षांहून अधिक काळापासून अधिकृत वितरक असलेले राहुल ऊर्फ गणेश मिटकरी यांनी यासंदर्भात कंपनीकडे तक्रार केली होती.
पुण्यातील महर्षीनगर परिसरातील मनमथ भागीरथ मोगरकर यांच्याकडून ‘गोपी’ साबणाच्या नावाचा गैरवापर करून बनावट साबणांची विक्री होत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
या तक्रारीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथील जिन्सी पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी सुनील मोरे आणि त्यांच्या पथकाने स्वारगेट पोलिसांच्या मदतीने संबंधित व्यावसायिकांच्या दुकानांवर छापे टाकले.
या कारवाईत बनावट असल्याचा संशय असलेला साबणसाठा जप्त करण्यात आला. तसेच, संबंधित दोन्ही व्यावसायिकांना पुढील चौकशीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात आल्याचे वितरकाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्येही बनावट साबणांच्या विक्रीप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. ३ ऑक्टोबर रोजी रोशन गेट परिसरातील लतीफ किराणा दुकानावर छापा टाकला असता, बनावट लेबल लावलेले साबणाचे खोके आढळून आले.
चौकशीदरम्यान हा माल पैठण परिसरातील एका कंपनीतून मागवण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित गोदामावरही छापा टाकला.
या कारवाईत हजारो साबण, साबणांचे बॉक्स, छपाईसाठी वापरण्यात येणारे साहित्य, प्लास्टिकचे स्टॅम्प आणि पावती पुस्तके असा एकूण ३ लाख ५३ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे.
या प्रकरणी अशोक काळे आणि सुनील अशोक काळे यांच्याविरुद्ध जिन्सी पोलीस ठाण्यात फसवणूक आणि व्यापारचिन्ह कायद्याशी संबंधित गुन्हा दाखल करण्यात आल्याचे प्रसिद्ध वृत्तात नमूद आहे.
पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे पुढील तपास करीत आहेत. बनावट साबणांच्या विक्रीचे जाळे किती विस्तृत आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.
