आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

२ किलो सोने चोरणारे काका पुतणे गजाआड

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 13, 2026
Spread the love

पुणे : सोन्याचे दागिने घडविणाऱ्या कारागिराचे घर बंद असताना कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि लोखंडी कपाटातील तब्बल २ कोटी २० लाख रुपयांचे २ किलो २०० ग्रॅम सोन्याचे दागिने व बिस्किटे चोरून नेली होती. खडक पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून दोघा चोरट्यांना पकडले. हे दोघेही चोरटे घरफोडी झालेल्या इमारतीतच राहत असल्याचे निष्पन्न झाले. खडक पोलिसांनी अवघ्या १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून चोरीला गेलेला सर्व ऐवज जप्त केला आहे.

मुस्तफा नजीर शेख (वय ३६) आणि सरफराज ऊर्फ आवेज मैन्नुद्दीन शेख (वय २२, दोघे रा. रविवार पेठ) अशी या चोरट्यांची नावे आहेत. याबाबत मोहम्मद तौफिक रज्जाक खान (वय ३६, रा. के. एन. जी. कॉम्प्लेक्स, रविवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

खान यांचे रविवार पेठेत नाईस कास्टिंग अँड गोल्ड स्मिथ या नावाचे सोन्या-चांदीचे दागिने बनविण्याचे दुकान आहे. दुकानात त्यांच्याकडे ६ कामगार आहेत.

ते रविवार पेठेतील विविध सोनारांकडून दागिने बनविण्याच्या ऑर्डर घेतात. सोनारांकडून दागिने बनविण्यासाठी आलेले सोने सुरक्षिततेसाठी ते घरीच ठेवत असतात.

पत्नी व मुलीचे दागिनेही घरातील लोखंडी कपाटात ठेवतात. १० ऑक्टोबरला सायंकाळी त्यांची पत्नी घराला कुलूप लावून बाहेर पडली असताना घराचे कुलूप तोडून घरफोडी करण्यात आली होती.

कपाटातील त्यांचे दागिने तसेच सोनारांकडून दागिने बनविण्यासाठी घेतलेली सोन्याची बिस्किटे, असा २ कोटी २० लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करण्यात आली. पोलीस अंमलदार हेमंत पेरणे, अमित जमदाडे, मयूर भोसले, सैफ नदाफ यांना फिर्यादी राहत असलेल्या इमारतीच्या खाली दोन जण संशयास्पदरीत्या घुटमळताना दिसून आले.

या संशयितांची गोपनीय माहिती काढून त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. हे दोघेही फिर्यादी राहत असलेल्या इमारतीतच राहत असल्याची माहिती मिळाली.

दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरून नेलेले तब्बल २ किलो २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली.

याव्यतिरिक्त आणखी ४६ ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे. खडक पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणून चोरीला गेलेला १०० टक्के ऐवज जप्त केल्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलीस सहआयुक्त संजय दराडे यांनी खडक पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राहुल मखरे, जयसिंग दाढे, अशोक खाडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष मोहिते, विनोद शिंदे, पोलीस अंमलदार मयूर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे, निलेश साबळे, विकास पांडोळे, सैफ नदाफ, उमेश मठपती आणि सागर कुडले यांनी केली आहे.