दारूच्या नशेत कुत्र्याला चौथ्या मजल्यावरून फेकले
कुत्र्याचा पाय, पाठीचा कणा मोडला : भवानी पेठेतील घटना, रिक्षाचालकावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दारूच्या नशेत रिक्षाचालकाने पामेरियन कुत्र्याला थेट चौथ्या मजल्यावरून खाली पत्र्यावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये कुत्र्याचा पाय आणि पाठीचा कणा मोडला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खडक पोलिसांनी या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
गणेश लक्ष्मण परदेशी (वय ५२, रा. राजधानी प्लाझा, रविवार पेठ) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या पद्मिनी पिटर स्टंम्प (वय ६८, रा. भवानी पेठ, शंकरशेठ रोड) यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना रविवार पेठेतील राजधानी प्लाझा या इमारतीत ९ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मिशन पॉसिबल फाऊंडेशन या संस्थेच्या संस्थापिका आहेत. या संस्थेमध्ये आजारी व जखमी प्राण्यांवर उपचार केले जातात. ९ ऑक्टोबर रोजी रात्री पावणेनऊ वाजता यश शेजवळ हा एका जखमी अवस्थेतील कुत्र्याला घेऊन आला. त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. कुत्र्याला काय झाले, असे विचारले असता, त्याने सांगितले की, रिक्षाचालक गणेश लक्ष्मण परदेशी हे या कुत्र्याचे मालक असून, त्यांनी त्यांच्या डॅनी नावाच्या पामेरियन कुत्र्याला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पत्र्यावर फेकून जबर जखमी केले आहे.
कुत्र्याला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी कुत्र्याचा पाय आणि पाठीचा मणका मोडल्याचे सांगितले. गणेश परदेशी हा रोज दारू पिऊन आपल्या कुत्र्याला हाताने, बेल्टने तसेच भिंतीवर आपटून मारहाण करतो. तसेच, त्याने कुत्र्याला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकल्याचे काही जणांनी पाहिले आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
गणेश परदेशी हा पाळीव कुत्र्याला मारहाण करून क्रूर वागणूक देत असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक ढोणे तपास करीत आहेत.
