आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मुलींच्या वसतिगृहात शिरणाऱ्या दोन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 13, 2026
Spread the love

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील विद्यार्थिनींच्या वसतिगृहात शिरून मॉरल पोलिसिंग करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्रमोद राठोड आणि ओंकार गोरे (दोघे सध्या रा. मुलांचे वसतिगृह, शिक्षणशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत विद्यापीठातील सुरक्षारक्षक संपत पाटील (वय ५१) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुलींच्या वसतिगृहात प्रवेश करण्यास बंदी आहे.

११ ऑक्टोबर रोजी रात्री अकराच्या सुमारास आरोपी विद्यार्थी बेकायदा मुलींच्या वसतिगृहात शिरले. आरोपींनी मुलींच्या वसतिगृहात घुसखोरी केली, असे सुरक्षारक्षक पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

सुरक्षारक्षकाने दिलेल्या तक्रारीनंतर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२९ (१) (बेकायदा प्रवेश करून धमकाविणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात एक विद्यार्थिनी रात्री ११ वाजता मित्राशी बोलत थांबली होती. यावेळी या दोघांनी तेथे जाऊन, “एवढ्या रात्री येथे काय करता? वसतिगृहात राहता का? नाईट गेट पास काढला आहे का?” अशा प्रश्नांचा भडिमार सुरू केला.

वसतिगृहाच्या सुरक्षारक्षकाकडे जाऊन, “तुम्ही यांना इथे उभे राहू कसे दिले?” असे म्हणत त्यांनी राडा घातला होता. या घटनेनंतर वसतिगृहातील विद्यार्थिनीशी दोन विद्यार्थ्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप करून विद्यार्थिनींनी सोमवारी पहाटे चतु:शृंगी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले होते.

या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विभागातील आणि वसतिगृहातील प्रवेश रद्द केल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच, या घटनेची दखल घेऊन वसतिगृहप्रमुखांनी या प्रकरणी राजीनामा दिला.

विद्यापीठातच शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थिनीची अनुचित चौकशी करून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्या अनुषंगाने विद्यार्थिनींनी कुलगुरूंची भेट घेऊन कठोर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले. पोलीस उपनिरीक्षक उमेश कोळी तपास करीत आहेत.