आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सोशल मीडिया पोस्टवरून पोलीस अंमलदार निलंबित

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 14, 2026
Spread the love

पुणे : सोशल मीडियावर हिंसाचाराचे समर्थन करणारी पोस्ट टाकून पोलीस दलाच्या शिस्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस अंमलदाराला पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी निलंबित केले आहे.

समाधान अभिमान गायकवाड असे या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. ते सध्या पोलीस मुख्यालयातील बी कंपनी येथे नियुक्तीस होते.

पोलीस अंमलदार समाधान गायकवाड यांनी सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध झालेल्या एका बातमीवर त्यांच्या वैयक्तिक इन्स्टाग्राम आयडीवरून अत्यंत आक्षेपार्ह, प्रक्षोभक आणि बेजबाबदार स्वरूपाची टिप्पणी केली होती. या बातमीचे शीर्षक ‘नेत्याला संपवलं, लाठी-काठी अन् दगडांनी केला हल्ला’ असे होते.

कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या शिस्तप्रिय पोलीस दलाचे जबाबदार घटक असूनही, समाजात हिंसाचार आणि कायद्याचे उल्लंघन करण्याचे समर्थन करणारी टिप्पणी करणे हे शासकीय कर्मचाऱ्याला लागू असलेल्या कर्तव्यपरायणता आणि शिस्तीचे उल्लंघन आहे. या कृत्यामुळे सामान्य जनमानसात पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे. हे बेशिस्त, नैतिक अधःपतनाचे तसेच शिस्तबद्ध पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे अशोभनीय वर्तन असल्याने पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी पोलीस अंमलदार समाधान गायकवाड यांना निलंबित केले आहे.