अंमली पदार्थांची विक्री करणारे तिघे जेरबंद
गॅस डिलिव्हरी करताना करत होते धंदा : खंडणी विरोधी पथकाची कारवाई, दीड लाखांचे अफिम जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहरात गॅस डिलिव्हरी करणाऱ्या मूळच्या राजस्थानमधील तिघांना खंडणीविरोधी पथकाने अंमली पदार्थांची विक्री करताना पकडले. त्यांच्याकडून १५६ ग्रॅम अफू, दोन मोबाईल, इलेक्ट्रिक वजनकाटा आणि दुचाकी असा १ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रामनिवास भवरराम बिष्णोई (वय २२, रा. खोपडेनगर, गुजर निंबाळकरवाडी), प्रकाश सुरजाराम बिष्णोई (वय ३२) आणि कैलाश सहीराम बिष्णोई (वय २२, दोघेही रा. खोपडेनगर, गुजर निंबाळकरवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
हे तिघेही राजस्थानचे रहिवासी आहेत. रामनिवास बिष्णोई हा सुमारे नऊ महिन्यांपूर्वी राजस्थानमधून पुण्यात आला आहे. त्यानंतर इतर दोघे पुण्यात आले. तिघेही गॅस सिलिंडर डिलिव्हरीचे काम करतात.
गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकातील पोलीस हवालदार संकपाळ आणि भोसले हे १२ ऑक्टोबर रोजी भारती विद्यापीठ परिसरात गस्त घालत होते.
त्यांना खोपडेनगर येथे तिघे जण अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे व त्यांच्या पथकाने खोपडेनगर येथील शिवतीर्थ बंगल्यासमोरील मोकळ्या मैदानात सापळा रचून तिघांना पकडले.
त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे १५६ ग्रॅम अफू हा अंमली पदार्थ, तसेच दोन मोबाईल, इलेक्ट्रिक वजनकाटा आणि दुचाकी असा १ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रणव संकपाळ, भोसले, सावंत, शिंदे, दुर्गे आणि पोलीस अंमलदार जगताप, खेडकर व शेख यांनी केली आहे.
