आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

साडेचार हजार किमी प्रवास करून टोळी जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 14, 2026
Spread the love

पुणे : गणेशोत्सवात भाविकांच्या गळ्यातील दागिने आणि मोबाईल चोरून पसार झालेल्या चोरट्यांच्या टोळीला विश्रामबाग पोलिसांनी हरियाणातील पलवल भागातून अटक केली. गुजरात आणि हरियाणा पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून ९ गुन्हे उघडकीस आले असून, १३ लाख रुपयांचे दागिने आणि कार असा एकूण २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अजय समशेरन विनोदकुमार रुपसिंग कोळी (वय २०, रा. समसाबाद, पलवल, हरियाणा), अमन समशेर अनिलकुमार नारायणसिंग कोळी (वय २४, रा. आदर्श कॉलनी, पलवल, हरियाणा) आणि दीपक समशेर राजूभाई सापसिंग (वय २१, रा. हिरानगर कॉलनी, पलवल, हरियाणा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

गणेशोत्सव तसेच विसर्जन मिरवणुकीत भाविकांचे दागिने चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणांचा तपास विश्रामबाग पोलिसांच्या पथकाकडून करण्यात येत होता. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, चोरटे हरियाणात पसार झाल्याचे समोर आले. या प्रकरणातील एक आरोपी गुजरातमधील अरवली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटकेत असल्याची माहिती मिळाली होती. अरवली पोलिसांच्या सहकार्याने त्याला या गुन्ह्यात ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यावेळी आरोपीने गणेशोत्सवात चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या दोन साथीदारांना हरियाणा पोलिसांच्या मदतीने पलवल भागातून पकडण्यात आले.

गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान त्यांनी गर्दीचा फायदा घेऊन ९ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी येण्या-जाण्यासाठी वापरलेली कार तसेच १३ लाख रुपयांचे दागिने, असा एकूण २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले आणि सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) विकास भिंगारदिवे व रमेश लाहिगुडे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके, पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड, मेहबुब मोकाशी, पोलीस अंमलदार सचिन कदम, नितीन मुंढे, महेश कदम, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, शशिकांत दरेकर, साहिल शेख, कैलास डुकरे, जाकीर मणियार, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, फिरोज इनामदार, अर्जुन थोरात आणि नितीन बाबर यांनी केली.